भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन

27 जुलै हा दिवस भारताच्या इतिहासातील एका तेजस्वी सूर्याच्या अस्ताचा दिवस आहे. भारताचे थोर शास्त्रज्ञ, 'मिसाईल मॅन', भारतरत्न आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा हा स्मृतिदिन. शरीराने ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही लाखो तरुणांच्या मनात स्वप्नांची ज्योत प्रज्वलित करतो आहे. त्यांनी दिलेला संदेश आजही प्रत्येक भारतीयासाठी दिशादर्शक दीपस्तंभ आहे, "मोठी स्वप्ने पाहा, कारण मोठी स्वप्नेच मोठी माणसे घडवतात."

आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण केवळ त्यांना श्रद्धांजली वाहून थांबू नये; तर ज्ञानसंपन्न, विज्ञाननिष्ठ, आत्मनिर्भर, नैतिक आणि विकसित भारत घडविण्याचा संकल्प करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, मित्रांनो..

सुमारे 1941 चा काळ. तमिळनाडूतील रामेश्वरमच्या अथांग समुद्रकिनारी एक दहा वर्षांचा मुलगा तासन्तास आकाशात भरारी घेणाऱ्या सीगल आणि बगळ्यांकडे विस्मयाने पाहत उभा राहत असे. त्या पंखांमध्ये त्याला केवळ पक्षी दिसत नव्हते, तर भविष्याच्या अमर्याद शक्यता दिसत होत्या. "माणसालाही असेच आकाशाला गवसणी घालता येईल का?" हा प्रश्न त्याच्या बालमनात सतत घुमत होता. त्या निरागस प्रश्नानेच पुढे भारताच्या अंतराळ आणि क्षेपणास्त्र युगाचा पाया रचला. तो बालक म्हणजेच डॉ. अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम.

15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. आई आशियम्मा आणि वडील जैनुलाब्दीन यांनी त्यांच्यावर प्रामाणिकपणा, साधेपणा, श्रमसंस्कार आणि अध्यात्म यांचे संस्कार केले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य होती; परंतु विचारांची श्रीमंती विलक्षण होती. तीर्थक्षेत्र रामेश्वरमचे सर्व धर्मसमभावाचे वातावरण आणि शिवमंदिराचे पुजारी लक्ष्मणशास्त्री यांच्यासह विविध व्यक्तींच्या सहवासाने त्यांच्या मनात मानवतेचा धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, ही भावना दृढ झाली.

लहानपणी त्यांनी भावाला वर्तमानपत्रे वाटण्यास मदत केली. गरिबीने त्यांच्या पायांना अडविण्याचा प्रयत्न केला; पण स्वप्नांनी त्यांच्या पंखांना बळ दिले. रामनाथपुरम येथील श्वार्ट्झ हायस्कूलमध्ये त्यांना इयादुराई सोलोमन यांच्यासारखे प्रेरणादायी गुरु लाभले. त्यांनी कलामांच्या मनात आत्मविश्वास, जिद्द आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा जागवली. पुढे सेंट जोसेफ कॉलेजमधून पदार्थविज्ञानाची (Physics ) पदवी घेतल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये वायु गतीशास्त्र (Aerodynamics) या शाखेची निवड केली. इथूनच त्यांच्या स्वप्नांना विज्ञानाचे खरे पंख लाभले.

वैमानिक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले; पण अपयशाने त्यांना खचवले नाही. उलट त्याच अपयशाने भारताला एक महान शास्त्रज्ञ दिला. अपयशाला पराभव नव्हे, तर यशाची पूर्वतयारी समजणारा हा विलक्षण माणूस होता.

1958 मध्ये संशोधन क्षेत्रात प्रवेश करून त्यांनी 'नंदी' या भारतीय बनावटीच्या हॉवरक्राफ्टच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेत रॉकेट अभियंता म्हणून त्यांची निवड झाली. 1962 मध्ये थुंबा येथील अवकाशतळ उभारणीपासून ते अमेरिकेतील 'नासा'मधील प्रशिक्षणापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे भारतीय विज्ञानाच्या उंच भरारीची सुरुवात होती.

डॉ. विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'रोहिणी' रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणात मोलाची भूमिका बजावली. पुढे SLV-3 या उपग्रह प्रक्षेपक वाहनाच्या यशस्वी निर्मितीमुळे भारताने स्वतःचा उपग्रह स्वतःच्या रॉकेटने अवकाशात पाठविण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. वैयक्तिक दुःख, कौटुंबिक संकटे आणि अनेक अडचणी त्यांच्या वाट्याला आल्य, पण ध्येयासमोर दुःखही नतमस्तक झाले.

भारतातील एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून त्यांनी 'अग्नि', 'पृथ्वी', 'आकाश', 'नाग' आणि 'त्रिशूल' या स्वदेशी क्षेपणास्त्रांची निर्मिती करून भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची नवी ओळख दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगाला स्पष्ट संदेश दिला की, शांततेची भाषा बोलणारा भारत स्वतःच्या संरक्षणासाठी सक्षमही आहे. त्यामुळेच संपूर्ण जगाने त्यांना आदराने 'मिसाईल मॅन ऑफ इंडिया' म्हणून गौरविले.

परंतु डॉ. कलाम यांचे सर्वात मोठे योगदान केवळ क्षेपणास्त्रनिर्मितीत नव्हते; ते होते तरुणांच्या मनात स्वप्नांची क्रांती घडविण्यात. त्यांनी अग्निपंख (Wings of Fire), Ignited Minds, India 2020 यांसारख्या पुस्तकांतून लाखो युवकांना ध्येयवादी जीवनाची प्रेरणा दिली. त्यांचा प्रत्येक शब्द हा आशेचा किरण होता आणि प्रत्येक विचार हा कृतीचा मंत्र होता.

2002 मध्ये भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदाची प्रतिष्ठा वाढवली. राष्ट्रपती भवनाचे दरवाजे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खुले केले. त्यांना राजकारणापेक्षा विद्यार्थी अधिक प्रिय होते. म्हणूनच ते म्हणायचे, "आजचा विद्यार्थीचं उद्याचा भारत घडवणार आहे." त्यांच्या दृष्टीने वर्गखोली हीच खरी राष्ट्रनिर्मितीची प्रयोगशाळा होती.

त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (1981), पद्मविभूषण (1990) आणि भारतरत्न (1997) या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरविले. देश-विदेशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून त्यांच्या ज्ञानकार्याला सलाम केला.

27 जुलै 2015 रोजी आयआयएम शिलाँग येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शिक्षक म्हणून जगलेला हा महापुरुष विद्यार्थ्यांना शिकवितानाच अनंतात विलीन झाला, यापेक्षा मोठे भाग्य एका शिक्षकालाही लाभू शकत नाही.

आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे..आपण त्यांच्या स्वप्नातील भारत घडवित आहोत की फक्त त्यांच्या छायाचित्रांवर पुष्पहार अर्पण करत आहोत? विकसित भारत केवळ घोषणांनी निर्माण होत नाही,तर तो संशोधनाने, गुणवत्तापूर्ण शिक्षणाने, वैज्ञानिक दृष्टिकोनाने, नैतिकतेने आणि परिश्रमाने उभा राहतो. ज्या राष्ट्रातील तरुण प्रश्न विचारतात, प्रयोग करतात, संशोधन करतात आणि नवसृजन करतात, ते राष्ट्रच जगाचे नेतृत्व करते.

म्हणूनच डॉ. कलाम यांचा स्मृतिदिन हा केवळ श्रद्धांजलीचा दिवस नसून स्वप्नांना कृतीत उतरविण्याचा दिवस आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात पुस्तक प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शने, वक्तृत्व स्पर्धा, संशोधन प्रकल्प, नवोपक्रम उपक्रम, वाचन संस्कृती अभियान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे कार्यक्रम आयोजित झाले पाहिजेत. कारण पुतळ्यांवर फुले वाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देणे, हीच डॉ. कलाम यांना खरी मानवंदना ठरेल.

"स्वप्ने ती नसतात जी झोपेत दिसतात; स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत." हा त्यांचा अमर संदेश प्रत्येक भारतीय तरुणाच्या हृदयात चेतनेची ज्योत बनून सदैव प्रज्वलित राहो, हीच त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

- त्यांचा एक वैचारिक चाहता आणि अभ्यासक.. ✍️

🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार

🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन