करिअर मार्गदर्शन लेख 51.. " आजचं शिक्षण.. उद्याचं भविष्य..!"

आजच्या काळात शिक्षण, पदवी, कौशल्ये, रोजगार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याभोवती मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही उद्योगपती, व्यावसायिक किंवा प्रभावशाली व्यक्ती “एमबीए निरुपयोगी आहे”, “अभियांत्रिकी पदव्यांना किंमत राहिली नाही”, “कंपन्या आता पदवीकडे पाहत नाहीत.” अशी विधाने करतात. सोशल मीडियावर ही वाक्ये आकर्षक मथळ्यांसह पसरतात आणि हजारो विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

प्रश्न असा उभा राहतो..मग शिक्षण घ्यायचे कशासाठी..? पदवी मिळवायची कशासाठी..? पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट का उपसावेत..?

हा प्रश्न केवळ करिअरचा नाही.., तो समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. शिक्षणाविषयीचा विश्वास डळमळीत करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. कारण भारतासारख्या देशात शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे, आर्थिक उन्नतीचे, विचारजागृतीचे आणि स्वाभिमानाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. विशेषतः ग्रामीण भागातील, मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पहिल्या पिढीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण म्हणजे घराच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आशा असते.

म्हणूनच आज स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे, मित्रांनो..शिक्षण निरुपयोगी झालेले नाही. निरुपयोगी झाले आहे ते फक्त पाठांतरावर आधारित, वास्तवापासून तुटलेले, कौशल्यविरहित आणि जीवनाशी संबंध नसलेले शिक्षण. पदवीची किंमत कमी झालेली नाही, किंमत कमी झाली आहे त्या पदवीची, जी ज्ञान, कौशल्य, विचार, व्यक्तिमत्त्व आणि जबाबदारी निर्माण करत नाही.

आजचा योग्य प्रश्न “पदवी की कौशल्य?” असा नाही. योग्य प्रश्न असा आहे, विद्यार्थ्याला शिक्षणासोबत कौशल्य, अनुभव, मूल्ये, विचारशक्ती आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची क्षमता कशी द्यायची?

शिक्षण आणि कौशल्ये हे एकमेकांचे विरोधक नाहीत. शिक्षण हा पाया आहे आणि कौशल्ये त्या पायावर उभी राहणारी कार्यक्षम रचना आहे. पाया नसलेली कौशल्ये दीर्घकाळ टिकत नाहीत आणि कौशल्यांशिवाय शिक्षण अपूर्ण ठरते. डॉक्टर, अभियंता, शिक्षक, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, संशोधक किंवा व्यवस्थापक.. कोणत्याही क्षेत्रात केवळ अनुभव पुरेसा नसतो तर त्यामागे शास्त्रीय समज, मूलभूत ज्ञान आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक असतो.

आज उद्योग क्षेत्र ‘जॉब रेडी’ उमेदवारांची मागणी करते, हे खरे आहे. कंपन्यांना केवळ प्रमाणपत्र धारक नव्हे, तर संवादकुशल, तंत्रज्ञानस्नेही, समस्यांचे समाधान शोधणारे, टीममध्ये काम करणारे, नेतृत्वगुण असलेले आणि सतत शिकणारे तरुण हवे आहेत. परंतु याचा अर्थ शिक्षण अनावश्यक झाले असा होत नाही. याचा अर्थ शिक्षण अधिक परिणामकारक, उद्योगसुसंगत आणि जीवनाभिमुख झाले पाहिजे.

🔰#AI च्या युगात शिक्षणाची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे!

आज कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, डिजिटल प्लॅटफॉर्म, डेटा, रोबोटिक्स आणि जागतिक स्पर्धेमुळे रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. काही पारंपरिक कामे कमी होतील, काही नष्ट होतील.. पण नवीन संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. या संधी त्या विद्यार्थ्यांना मिळतील, ज्यांच्याकडे शिक्षणाचा पाया, कौशल्यांचा सराव आणि शिकत राहण्याची वृत्ती असेल?

उदाहरणार्थ, सिव्हिल इंजिनीअरिंग संपले असे म्हणणे हास्यास्पद आहे.. महाराष्ट्रात मेट्रो, महामार्ग, पूल, विमानतळ, शहरी पुनर्विकास, जलसंधारण, पूरनियंत्रण, परवडणारी घरे, हरित बांधकामे आणि सुरक्षित पायाभूत सुविधा यासाठी सक्षम अभियंत्यांची आवश्यकता आहेच. मात्र आजच्या अभियंत्याला फक्त काँक्रीट आणि डिझाइन पुरेसे नाही. त्याला हवामान जोखीम, प्रकल्प वित्त, सुरक्षा मानके, पर्यावरण आणि तंत्रज्ञान यांचीही समज असावी लागेल.

कॉम्प्युटर इंजिनीअरला फक्त कोड लिहिता येणे पुरेसे नाही. त्याला डेटा, सायबर सुरक्षा, AI चा जबाबदार वापर, आरोग्य, शेती, वाहतूक, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्या समजल्या पाहिजेत. इलेक्ट्रिकल इंजिनीअरला ग्रिड, अक्षय ऊर्जा, EV चार्जिंग, ऊर्जा साठवणूक आणि स्मार्ट सिस्टम्स यांची जाण असली पाहिजे.

एमबीए बाबतही हेच लागू होते. व्यवस्थापनशास्त्र निरुपयोगी नाही..पण ते फक्त प्रेझेंटेशन, इंग्रजी शब्दजंजाळ आणि कॉर्पोरेट जगापुरते मर्यादित राहिले तर त्याचा उपयोग कमी होतो. देशाला डेटा समजणारे, प्रकल्पाचे मूल्यमापन करणारे, वित्तीय नियोजन करणारे, पारदर्शक खरेदी प्रणाली उभारणारे, स्थानिक विकासासाठी काम करणारे आणि सार्वजनिक व्यवस्थापन समजणारे तरुण व्यवस्थापक हवे आहेत. एमबीए केवळ बहुराष्ट्रीय कंपनीसाठी नाही; तो जिल्हा नियोजन, नगरपालिका वित्त, आरोग्य व्यवस्थापन, शिक्षण डेटा, ग्रामीण उद्योजकता आणि सामाजिक क्षेत्रातही अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

आज खरी गरज आहे ती शिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालण्याची. कॉलेजांनी अभ्यासक्रम बदलले, पण उद्योग, शासन आणि स्थानिक संस्था जुन्याच पद्धतीने भरती करत राहिल्या, तर बदल अपुरा राहील. विद्यार्थ्यांना डेटा अॅनालिटिक्स शिकवले, पण जिल्हा प्रशासनात डेटा-आधारित नियोजनाची पदेच नसतील, तर ते कौशल्य वाया जाईल. म्हणून शिक्षणसुधारणा आणि नोकरीची रचना यांचा एकत्र विचार करणे आवश्यक आहे.

आज आरोग्य क्षेत्रात डॉक्टर, नर्स आणि फार्मासिस्ट यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. मात्र आता केवळ वैद्यकीय पदवी पुरेशी राहिलेली नाही. डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स, टेलिमेडिसिन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित निदान, रोबोटिक शस्त्रक्रिया, जीनोमिक्स, डेटा अॅनालिटिक्स आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन यांचा वापर झपाट्याने वाढत आहे.

म्हणूनच उद्याचा डॉक्टर केवळ औषधोपचार करणारा नसून तंत्रज्ञान समजून घेणारा, संशोधनाभिमुख, संवादकुशल आणि रुग्णकेंद्रित असावा लागेल. नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक वैद्यकीय उपकरणे, डिजिटल रुग्ण नोंदी, आपत्कालीन व्यवस्थापन आणि जागतिक आरोग्य मानके समजून घ्यावी लागतील. म्हणजेच आरोग्य क्षेत्रातील शिक्षण संपलेले नाही; उलट ते अधिक व्यापक, अधिक आधुनिक आणि अधिक जबाबदारीचे झाले आहे.

अनेकांना अजूनही शेती म्हणजे पारंपरिक पद्धतीने पीक घेणे इतकाच अर्थ वाटतो. प्रत्यक्षात आजची शेती ही विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांचा संगम बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, बाजारपेठेतील स्पर्धा आणि उत्पादन खर्च यामुळे आधुनिक कृषी शिक्षणाची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे.

आजच्या कृषी पदवीधराला केवळ पिकांचे ज्ञान असून चालणार नाही. त्याला ड्रोनद्वारे पीक निरीक्षण, प्रिसिजन फार्मिंग, मृदा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी सल्ला, कृषी डेटा विश्लेषण, ई-मार्केटिंग, अन्न प्रक्रिया, पुरवठा साखळी (Supply Chain) आणि कृषी उद्योजकता यांचेही ज्ञान असावे लागेल. भविष्यात अन्नसुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी आधुनिक कृषी तज्ज्ञांची गरज मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे शेती आणि कृषी शिक्षणाची किंमत कमी झालेली नाही; उलट ती अधिक वाढली आहे.

पूर्वी अकाउंटंटचे काम म्हणजे हिशोब लिहिणे आणि बँक कर्मचाऱ्यांचे काम म्हणजे व्यवहार करणे एवढेच मर्यादित होते. आज बहुतेक व्यवहार डिजिटल झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, ऑनलाइन बँकिंग आणि फिनटेक कंपन्यांमुळे पारंपरिक कामांचे स्वरूप बदलत आहे.

मात्र याचा अर्थ B.Com, M.Com, CA किंवा Finance क्षेत्राची गरज संपली असा नाही. आजच्या वित्त क्षेत्रातील व्यावसायिकाला डेटा अॅनालिटिक्स, डिजिटल अकाउंटिंग, GST, सायबर फसवणूक प्रतिबंध, आर्थिक नियोजन, गुंतवणूक व्यवस्थापन, फिनटेक, ब्लॉकचेन आणि AI आधारित आर्थिक विश्लेषण यांची माहिती असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे उद्याचा कॉमर्स पदवीधर केवळ अकाउंटंट न राहता आर्थिक सल्लागार, डेटा विश्लेषक, गुंतवणूक तज्ज्ञ, फिनटेक व्यावसायिक किंवा उद्योजकही बनू शकतो.

आज अनेकजण म्हणतात की, "AI आल्यामुळे शिक्षकांची गरज राहणार नाही." पण हे वास्तवापासून दूर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना माहिती देऊ शकते; मात्र प्रेरणा, संस्कार, चिकित्सक विचार, चारित्र्यनिर्माण आणि जीवनमूल्ये घडवू शकत नाही.

आजच्या शिक्षकाला केवळ पाठ्यपुस्तक शिकवून चालणार नाही. त्याला डिजिटल शिक्षण, AI आधारित अध्यापन, प्रकल्पाधारित शिक्षण, कौशल्याधारित मूल्यमापन, करिअर मार्गदर्शन, भावनिक समुपदेशन आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतांची ओळख करून देण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल. उद्याचा शिक्षक हा केवळ "ज्ञान देणारा" नसून "विद्यार्थ्यांच्या भविष्याचा शिल्पकार" असेल. त्यामुळे शिक्षण क्षेत्र संपत नाही; ते अधिक जबाबदारीचे आणि अधिक परिणामकारक होत आहे.

याच संदर्भात ‘कस्टमाइज्ड एज्युकेशन’ किंवा वैयक्तिक गरजेनुसार शिक्षण ही संकल्पना महत्त्वाची ठरते. पूर्वी शिक्षण म्हणजे एकच पदवी, एकच अभ्यासक्रम, एकच मार्ग असे मानले जात असे. पण आज विद्यार्थी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात. त्यांच्या आवडी, क्षमता, आर्थिक परिस्थिती आणि करिअरच्या दिशा वेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी एकच शिक्षणमॉडेल पुरेसे ठरणार नाही.

अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, व्यवस्थापन, आरोग्य, शेती, शिक्षण किंवा वाणिज्य—कोणतेही क्षेत्र संपत नाही; बदलते ते त्या क्षेत्रातील कामाचे स्वरूप. म्हणूनच आजची खरी गरज "पदवी बदलण्याची" नाही, तर "पदवीसोबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवण्याची" आहे. भविष्यात यश त्यांनाच मिळेल, जे बदलांना घाबरणार नाहीत, तर शिकण्याची आणि स्वतःला सतत विकसित करण्याची वृत्ती जपतील.

🔰शिक्षणाचे अवमूल्यन नव्हे... शिक्षणाचे पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ!

आजच्या काळात पूर्ण पदवीसोबत अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, मायक्रो-क्रेडेन्शियल्स, इंटर्नशिप, प्रकल्पाधारित शिक्षण, ऑनलाइन कोर्सेस, अप्रेंटिसशिप आणि उद्योगाशी संलग्न प्रशिक्षण यांची गरज आहे. मात्र याचा अर्थ पदवीची जागा प्रमाणपत्रांनी घ्यावी असा नाही. संपूर्ण पदवी व्यापक विचार देते, तर प्रमाणपत्रे विशिष्ट कौशल्ये देतात. विद्यार्थ्यांनी दोन्हींचा समतोल साधला पाहिजे.

जसे संगीत क्षेत्रात संपूर्ण अल्बमसोबत स्वतंत्र गाणे ऐकण्याची सुविधा आली, तसे शिक्षणातही लवचिकता आवश्यक आहे. पण शिक्षणाचे ‘स्पॉटिफायकरण’ (प्रत्येक विद्यार्थ्याला एकच अभ्यासक्रम शिकवण्याऐवजी त्याच्या आवडीनुसार, करिअरच्या गरजेनुसार आणि उद्योगाच्या अपेक्षेनुसार शिक्षण निवडण्याची मुभा देणे.) करताना गुणवत्ता, विश्वसनीयता आणि रोजगारमूल्य यांची काळजी घेतली नाही, तर प्रमाणपत्रांचा बाजार निर्माण होईल. विद्यार्थी कोर्सवर कोर्स करतील; पण करिअर स्पष्ट होणार नाही. 

म्हणूनच कोणताही कोर्स निवडताना विद्यार्थ्यांनी विचार करावा..हे कौशल्य कोणत्या क्षेत्रात वापरले जाणार आहे? त्यातून रोजगार, उद्योजकता किंवा पुढील शिक्षणाची संधी मिळेल का? त्याला मान्यता आणि विश्वासार्हता आहे का?

कौशल्य शिक्षणाबाबत समाजात अजूनही दुटप्पी दृष्टिकोन आहे. आपण हातगुणांचे महत्त्व बोलतो; पण प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, कारपेंटर, टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, शेफ, मशीन ऑपरेटर या कामांना पुरेशी सामाजिक प्रतिष्ठा देत नाही. जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांनी कौशल्याधारित व्यवसायांना मान, प्रमाणपत्र, अप्रेंटिसशिप, प्रगतीचा मार्ग आणि सुरक्षित वेतन दिले. म्हणून तिथे हातगुणांना प्रतिष्ठा आहे.

भारतामध्ये ITI, कौशल्य योजना आणि प्रशिक्षण संस्था आहेत; पण अनेक ठिकाणी उद्योगांचा विश्वास, दर्जेदार प्रशिक्षण, सुरक्षित कामाचे वातावरण, विमा, करार, वेतन आणि सामाजिक सन्मान या बाबतीत अजूनही कमतरता आहे. कौशल्य म्हणजे फक्त स्वस्त मजूर तयार करणे नव्हे. कौशल्य म्हणजे सन्माननीय काम, सुरक्षित उत्पन्न, प्रगतीचा मार्ग आणि मानवी प्रतिष्ठा.

विद्यार्थ्यांसाठी आजचा सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे, फक्त पदवीवर अवलंबून राहू नका; पण पदवीला कमीही लेखू नका. तुमचे शिक्षण मजबूत करा, त्यासोबत संवाद कौशल्य, इंग्रजी आणि मातृभाषेतील अभिव्यक्ती, डिजिटल कौशल्ये, AI टूल्सचा जबाबदार वापर, आर्थिक साक्षरता, समस्या सोडवण्याची क्षमता, टीमवर्क आणि प्रत्यक्ष अनुभव जोडा. रोज थोडे वाचा, थोडे शिका, थोडे करून पाहा आणि थोडे स्वतःचे विचार लिहा.

पालकांनीही केवळ “माझ्या मुलाने डॉक्टर, इंजिनीअर किंवा सरकारी अधिकारीचं व्हावे..!” या चौकटीबाहेर विचार करायला हवा. प्रत्येक मुलाची क्षमता, आवड, स्वभाव आणि कौशल्य वेगळे असते. काही मुले संशोधनात चांगली असतात, काही तंत्रज्ञानात, काही व्यवस्थापनात, काही कला, क्रीडा, सेवा, व्यवसाय किंवा हातगुणांमध्ये. पालकांचे काम मुलांवर करिअर लादणे नाही; तर त्यांना योग्य दिशा, शिस्त, मूल्ये आणि संधी देणे आहे.

शिक्षक आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी अधिक मोठी आणि व्यापक होत आहे. शिक्षण परीक्षा-केंद्रित न ठेवता जीवन-केंद्रित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना फक्त उत्तरं पाठ करायला शिकवू नका; प्रश्न विचारायला शिकवा. फक्त गुणांसाठी शिकवू नका; समज, विचार, शोध, संवाद आणि कृतीसाठी शिकवा. प्रत्येक विषयात प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडला पाहिजे. गणित बाजारात, विज्ञान शेतीत, भाषा संवादात, अर्थशास्त्र घरगुती नियोजनात, तंत्रज्ञान समाजाच्या समस्या सोडवण्यात वापरले गेले पाहिजे.

धोरणकर्त्यांनीही शिक्षण व रोजगार यांना वेगळे न पाहता एकात्मिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. अभ्यासक्रम अद्ययावत करणे, उद्योग-शिक्षण सहकार्य वाढवणे, इंटर्नशिप अनिवार्य करणे, जिल्हास्तरावर कौशल्य नकाशे तयार करणे, स्थानिक रोजगार संधी ओळखणे, सार्वजनिक क्षेत्रात नव्या कौशल्याधारित पदांची निर्मिती करणे आणि कौशल्य व्यवसायांना सामाजिक सुरक्षा देणे ही काळाची गरज आहे.

आज अनेक पदवीधर बेरोजगार आहेत, हे वास्तव आहे. अनेक तरुण स्पर्धा परीक्षांच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे थांबलेले आहेत. सरकारी नोकरी सुरक्षित वाटते, कारण खासगी क्षेत्रातील सुरुवातीच्या नोकऱ्या अनेकदा कमी वेतनाच्या आणि असुरक्षित असतात. त्यामुळे तरुणांना दोष देण्यापेक्षा रोजगारव्यवस्था, वेतनमान, कौशल्यांचे मूल्यांकन आणि कामगार सुरक्षा यांचाही विचार करावा लागेल.

AI च्या काळात विद्यापीठे संपतील असे अनेकदा सांगितले जाते. पण इतिहास सांगतो..इंटरनेट आले, ऑनलाइन कोर्सेस आले, बूटकॅम्प आले, कोविडनंतर डिजिटल शिक्षण वाढले; तरी विद्यापीठे संपली नाहीत. प्रश्न विद्यापीठे टिकतील का हा नाही; प्रश्न ती बदलतील का हा आहे, मित्रांनो.

 AI चा वापर फसवणूक किंवा कॉपी करण्यासाठी करणारी शिक्षणसंस्था बौद्धिकदृष्ट्या कमकुवत होईल. पण AI ला शिकण्याचा साथीदार, संशोधनाचे साधन, वैयक्तिक मार्गदर्शक आणि सर्जनशीलतेचे माध्यम बनवणारी संस्था भविष्यात पुढे जाईल.

म्हणूनच मित्रांनो..शिक्षणाला नाकारू नका; शिक्षणाला नव्याने घडवा. पदवीला पुरू नका; पदवीला कौशल्य, अनुभव आणि जीवनदृष्टी जोडा. हातगुणांचे केवळ रोमँटिकीकरण करू नका; त्यांना संस्थात्मक सन्मान, सुरक्षितता आणि सभ्य वेतन द्या. विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर विचारशील नागरिक, जबाबदार माणूस आणि समाजनिर्माता म्हणून घडवा.

उद्याचा भारत फक्त कोडर, इंजिनीअर, एमबीए किंवा प्रशासकीय अधिकारी यांच्यावर उभा राहणार नाही. तो सुशिक्षित शेतकरी, कुशल तंत्रज्ञ, संवेदनशील नर्स, जबाबदार शिक्षक, प्रामाणिक उद्योजक, सक्षम कारागीर, डेटा समजणारे प्रशासक, संशोधक, कलाकार आणि समाजाभिमुख नागरिक यांच्या एकत्रित शक्तीवर उभा राहील.

म्हणून आज विद्यार्थ्यांना सांगावेसे वाटते, शिका, पण फक्त पदवीसाठी नाही; समजण्यासाठी शिका. कौशल्ये मिळवा, पण फक्त नोकरीसाठी नाही; समाजातील समस्या सोडवण्यासाठी मिळवा. तंत्रज्ञान वापरा, पण विचार गहाण ठेवू नका. स्पर्धा करा, पण मूल्ये हरवू नका. यश मिळवा, पण माणुसकी विसरू नका.

आणि पालकांना सांगावेसे वाटते, मुलांना भीती देऊ नका, दिशा द्या. तुलना करू नका, समजून घ्या. केवळ गुणपत्रिका पाहू नका, मुलांची जिज्ञासा, प्रामाणिकपणा, मेहनत आणि शिकण्याची तयारी पाहा. कारण भविष्यात सर्वाधिक यश त्यांनाच मिळेल, जे आयुष्यभर शिकत राहतील.

शेवटी प्रश्न “शिक्षण की कौशल्य?” असा नाही. प्रश्न आहे, भक्कम शिक्षण, आधुनिक कौशल्ये, प्रत्यक्ष अनुभव, नैतिक मूल्ये, विचारशीलता आणि निरंतर शिकण्याची वृत्ती यांचा समतोल आपण साधू शकतो का?

जर हा समतोल साधला, तर शिक्षण केवळ पदवी देणार नाही; ते व्यक्तिमत्त्व घडवेल. कौशल्ये केवळ रोजगार देणार नाहीत; ती स्वाभिमान देतील. आणि तरुणाई केवळ नोकरी शोधणारी पिढी राहणार नाही; ती नवा भारत घडवणारी विचारशील, सक्षम आणि सर्जनशील शक्ती बनेल.

शिक्षणाला महत्त्व नाही असे सांगणे थांबवा.शिक्षणाला वास्तवाशी जोडा.कौशल्यांना सन्मान द्या.आणि तरुणांच्या भवितव्याला दिशा द्या.

-लेख संकलित माहितीवर संपादित.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार

ह्या क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन आणि भविष्यातील संधी यावर मोफत मार्गदर्शन आणि संवादासाठी संपर्क :

wa.me/+919970717187

Dr.A.P.J.Abdul Kalam Vocational Training & Skill 
Development Academy Parbhani (MS)

Online Brochure and Course List👇

https://heyzine.com/flip-book/14718f1b7e.html

Officail Website 
https://dkvfresearchfoundation.in