" एखाद्या राष्ट्राचा खरा विकास हा केवळ उंच इमारतींनी होत नाही; तो विचारांनी समृद्ध विद्यापीठे, संशोधनशील महाविद्यालये आणि जागरूक विद्यार्थ्यांनी घडतो. ज्या देशातील महाविद्यालये ओस पडू लागतात, त्या देशाच्या भविष्याची पायाभरणीही कमकुवत होऊ लागते."

🎓 आजच शिक्षण.. उद्याचं भविष्य.. लेख क्र. 55..✍️

आज महाराष्ट्रासह देशातील अनेक पारंपरिक महाविद्यालयांचे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने, वाचनालयांच्या शांत अभ्यासाने, प्रयोगशाळांतील संशोधनाने आणि विचार मंथनाने जिवंत असलेली महाविद्यालये आज प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाट पाहत उभी आहेत. रिकामे वर्ग, ओस पडलेले परिसर आणि घटती पटसंख्या ही केवळ शैक्षणिक समस्या नाही तर ती राष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक आणि आर्थिक आरोग्याची धोक्याची घंटा आहे.

#प्रश्न असा आहे की, ही वेळ आलीच कशी..?

महाविद्यालये ओस पडत आहेत, पण नेमकं कोण अपयशी ठरत आहे? दोष फक्त विद्यार्थ्यांचा आहे का? की पालकांचा? मुक्त आणि ऑनलाईन विद्यापीठांचा? की उच्च शिक्षणाला केवळ बाजारपेठेतील वस्तू बनविणाऱ्या धोरणांचा? शिक्षण महाग करून गुणवत्तेची गळचेपी कोणी केली? सार्वजनिक शिक्षणातील गुंतवणूक कमी करून खासगीकरणाला खतपाणी कोणी घातले? संशोधन, प्रयोगशाळा, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि आधुनिक कौशल्यांकडे दुर्लक्ष कोणी केले? पदवीधरांच्या हातात प्रमाणपत्र दिले,पण रोजगाराची हमी का दिली नाही? स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या पेपरफुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख कोणी केली? शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीचे साधन न मानता नफ्याचा उद्योग बनविण्याची परवानगी कोणी दिली?

आज अनेक अनुदानित महाविद्यालयांच्या वर्गखोल्या रिकाम्या आहेत, पण त्या रिकाम्या कोणी केल्या? विद्यार्थी महाविद्यालयांपासून दूर गेले की महाविद्यालयेच विद्यार्थ्यांच्या भविष्यापासून दूर गेली? शिक्षणव्यवस्था काळाच्या वेगाशी धावण्यात अपयशी ठरली की राज्यकर्त्यांनीच तिचे पाय जखडून ठेवले? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर आजही आपण या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली नाहीत, तर उद्या विद्यापीठे उभी राहतील की फक्त त्यांच्या भग्न इमारती इतिहासाची साक्ष देतील?

आज जगातील विकसित राष्ट्रे शिक्षणाकडे खर्च म्हणून नव्हे, तर भविष्यावर केलेली सर्वात मोठी गुंतवणूक म्हणून पाहतात. अमेरिकेतील, ब्रिटनमधील, जर्मनीतील, जपानमधील आणि दक्षिण कोरियातील विद्यापीठे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), सायबर सिक्युरिटी, क्वांटम कॉम्प्युटिंग, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान आणि अवकाश विज्ञान यांसारख्या क्षेत्रांत जगाचे नेतृत्व मिळविण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. ते निरंतरपणे भविष्यातील उद्योग, रोजगार आणि संशोधन घडवत आहेत.

परंतु आपण मात्र अनेकदा भविष्यातील कौशल्यांपेक्षा भूतकाळातील गौरव गाथांमध्ये अधिक रमल्याचे दिसतोय. इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा आहे..मान्य आहे , परंतु इतिहासातचं अडकून राहणे राष्ट्राला पुढे नेत नाही. मुळे जपणाऱ्या झाडालाच आकाशाला स्पर्श करता येतो, मुळांनाच धरून बसलेल्या झाडाची वाढ मात्र खुंटते. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल राखणे हीच खरी शहाणपणाची वाट आहे,मित्रांनो..

#मुक्त आणि ऑनलाईन विद्यापीठे आणि बदलती विद्यार्थ्यांची पसंती..

वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येमागे मुक्त विद्यापीठे आणि दूरस्थ शिक्षण संस्थांचा प्रभावही महत्त्वाचा आहे. कमी शुल्क, उपस्थितीची सक्ती नसणे, नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसोबत पदवी पूर्ण करण्याची सुविधा, अभ्याक्रम पूर्ण करीत असताना लवचिकता, निवास व प्रवास खर्चाची बचत आणि डिजिटल शिक्षणाची उपलब्धता यामुळे अनेक विद्यार्थी या सर्व पर्यायांकडे आप आपल्या सोयीनुसार वळत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने दूरस्थ शिक्षणाला अधिक वैधता आणि प्रोत्साहन दिले. त्यामुळे शिक्षण अधिक लवचिक झाले, ही सकारात्मक बाब आहे. परंतु याच वेळी पारंपरिक महाविद्यालयांना नव्या परिस्थितीनुसार बदलण्याची संधी आणि साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाहीत. परिणामी कला आणि वाणिज्य शाखांतील अनेक तुकड्या बंद पडू लागल्या, अनुदान कमी झाले, प्राध्यापक अतिरिक्त ठरू लागले आणि संपूर्ण शैक्षणिक रचना डळमळीत झाली आहे.

मुळात मुक्त शिक्षणाचा उद्देश औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, ग्रामीण, नोकरदार किंवा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी देणे हा होता. आज मात्र सोयीचा पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होत आहे. ही बदलती वास्तविकता स्वीकारत पारंपरिक महाविद्यालयांनी स्वतःची गुणवत्ता, संशोधन, सामाजिक-सहभाग, उद्योग सहभाग, कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि रोजगाराभिमुखता वाढविणे ही काळाची गरज आहे.

#शिक्षणाचे व्यापारीकरण : ज्ञानाचा बाजार की समाजनिर्मिती?

गेल्या काही दशकांत उच्च शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला. शिक्षणाकडे सार्वजनिक जबाबदारी म्हणून नव्हे, तर नफ्याच्या व्यवसायाच्या नजरेने पाहिले जाऊ लागले. ज्ञानार्थी "ग्राहक" झाले आणि शिक्षणसंस्था "सेवा पुरवठादार" बनल्या..याचा परिणाम असा झाला की अनेक ठिकाणी शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा मार्ग न राहता आर्थिक व्यवहाराचा विषय बनला. शिक्षणसंस्थांची संख्या वाढली..पण प्रत्येक ठिकाणी गुणवत्ता, संशोधन, सामाजिक बांधिलकी आणि उत्कृष्ट शिक्षकवर्ग तितक्याच प्रमाणात वाढला का, हा प्रश्न विचारावा लागेल.

आज अनेक गरीब, ग्रामीण, आदिवासी, दलित, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा खर्च परवडणारा राहिलेला नाही. संविधानाने दिलेली समान संधी ही केवळ कागदावर राहू नये तर ती प्रत्यक्षात प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात उतरली पाहिजे. अन्यथा शिक्षणातील विषमता ही सामाजिक विषमतेला अधिक खोलवर रुजवत राहील.

#शासनाची जबाबदारी आणि सार्वजनिक शिक्षण..

एक काळ असा होता की सार्वजनिक शिक्षण हे राज्याची प्राथमिक जबाबदारी मानले जात होते. नंतर अनुदान कमी झाले, विनाअनुदान धोरण आले आणि आता स्वयंपूर्ण आर्थिक मॉडेलच्या नावाखाली अनेक संस्थांवर आर्थिक ओझे टाकले जात आहे.

शिक्षण ही बाजारातील वस्तू नाही,तर ती लोकशाहीची जीवनवाहिनी आहे. ज्या समाजात शिक्षणावरची सार्वजनिक गुंतवणूक कमी होते, त्या समाजात अज्ञान, बेरोजगारी, विषमता आणि सामाजिक असंतोष वाढण्याचा धोका वाढतो.

#बेरोजगारी : विद्यार्थ्यांच्या विश्वासाला लागलेला तडा..

आज अनेक विद्यार्थी असा प्रश्न विचारतात , "महागडी पदवी घेऊनही रोजगाराची हमी नसेल, तर शिकायचे कशासाठी?"

हा प्रश्न केवळ भावनिक नाही, तर तो वास्तव आहे. पदवीधर बेरोजगारी ही देशासमोरील मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांचा विश्वास कमी होणे स्वाभाविक आहे.

महाविद्यालयांनी केवळ पदव्या देण्याऐवजी उद्योग, संशोधन, स्टार्टअप, कौशल्य विकास, इंटर्नशिप आणि उद्योजकता यांना जोडणारी शिक्षणव्यवस्था उभारणे आवश्यक आहे. शिक्षणाचे मूल्य केवळ प्रमाणपत्रात नसते तर ते व्यक्तीला सक्षम, स्वावलंबी आणि समाजोपयोगी बनविण्यात असते.

#डिजिटल युग आणि दिशाहीन तरुणाई..

आज स्वस्त इंटरनेट आणि मोबाईलमुळे माहिती प्रत्येकाच्या हातात आली आहे; पण माहिती आणि ज्ञान यात मोठा फरक आहे. मोबाईल हा साधन आहे, तो शिक्षकाला पर्याय नाही.

सोशल मीडियाच्या आहारी गेलेली, अल्पकालीन प्रसिद्धीच्या मोहात अडकलेली आणि सतत तुलना करणारी मानसिकता अनेक विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी करत आहे. हातात मोबाईल आहे; पण हातात पुस्तक नाही. स्क्रीन उजळली आहे; पण अनेकांच्या भविष्याचा दिवा मात्र मंदावत चालला आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे.

#जागतिक स्पर्धा आणि आपल्या शिक्षणाची दिशा..

हार्वर्ड, ऑक्सफर्ड, केंब्रिज, एमआयटी किंवा इतर जागतिक विद्यापीठे संशोधनावर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करतात. ते केवळ पदवीधर तयार करत नाहीत तर ते नवे वैज्ञानिक, संशोधक, विचारवंत आणि उद्योजक घडवतात.

आपणही आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगावा; परंतु त्याचवेळी भविष्यातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंशोधनातही जगाशी स्पर्धा करावी. भूतकाळ प्रेरणा देतो, पण भविष्य घडविण्यासाठी वर्तमानात कृती करावी लागते.

#स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि खचलेली पिढी..

स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांनी लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला मोठा धक्का बसला आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फेरले जाते, तेव्हा केवळ परीक्षा रद्द होत नाही,तर त्यांची स्वप्ने, आत्मविश्वास आणि व्यवस्थेवरील श्रद्धाही तुटते.

तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यापासून परावृत्त करण्याऐवजी त्यांच्या गुणवत्तेला योग्य संधी देणे ही राज्यव्यवस्थेची जबाबदारी आहे. कौशल्याधारित व्यवसायांचा सन्मान नक्कीच व्हावा; पण तो विद्यार्थ्यांच्या आकांक्षा कमी लेखून नव्हे, तर सर्व क्षेत्रांना समान प्रतिष्ठा देऊन.

#महाविद्यालये वाचली तरच भविष्य वाचेल..

ओस पडणारी महाविद्यालये ही केवळ रिकामी इमारती नाहीत, तर ती राष्ट्राच्या स्वप्नांची रिकामी होत चाललेली दालने आहेत. शिक्षणाचे व्यापारीकरण, सार्वजनिक गुंतवणुकीतील घट, बेरोजगारी, अभ्यासक्रमातील कालबाह्यता, संशोधनाचा अभाव, स्पर्धा परीक्षांतील गैरव्यवहार आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात आलेला विलंब या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम आज आपण पाहत आहोत.

आता तरी आपण जागे होणे आवश्यक आहे. शिक्षणाला पुन्हा राष्ट्रनिर्मितीचे केंद्रस्थान द्यावे लागेल. सार्वजनिक महाविद्यालये सक्षम करावी लागतील. संशोधनाला चालना द्यावी लागेल. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले, संविधाननिष्ठ, चिकित्सक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील नागरिक बनविणारी शिक्षणव्यवस्था उभी करावी लागेल.

कारण एखाद्या राष्ट्राचा पराभव रणांगणावर होत नाही, तो वर्गखोल्या ओस पडू लागतात, वाचनालये रिकामी होतात आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने विझू लागतात, तेव्हाच सुरू होतो. महाविद्यालये वाचवणे म्हणजे केवळ संस्था वाचवणे नव्हे, तर भारताचे भविष्य, लोकशाहीची ताकद आणि समाजाची बौद्धिक संपत्ती वाचवणे होय.

आज गरज दोषारोपांची नाही, तर सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची आहे. शासनाने सार्वजनिक शिक्षणावरील गुंतवणूक वाढवावी, महाविद्यालयांना आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, डिजिटल सुविधा आणि उद्योग-संलग्न अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत. विद्यापीठांनी काळानुरूप अभ्यासक्रम अद्ययावत करून कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, हरित तंत्रज्ञान, उद्योजकता आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य द्यावे. महाविद्यालयांनी केवळ पदव्या वाटणाऱ्या संस्था न राहता, विचार घडवणारी, संशोधनाला चालना देणारी, रोजगारनिर्मितीला हातभार लावणारी आणि समाजाशी नाळ जोडणारी ज्ञानकेंद्रे बनले पाहिजेत. पालकांनी पदवीपेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्यावे, तर विद्यार्थ्यांनी शॉर्टकट नव्हे तर सातत्यपूर्ण अध्ययन, कौशल्यविकास आणि चिकित्सक विचारसरणीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

शिक्षण वाचवायचे असेल तर ते केवळ सरकारचे काम नाही; शिक्षक, पालक, विद्यार्थी, उद्योगक्षेत्र, समाज आणि धोरणकर्ते अशा प्रत्येक घटकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. वर्गखोलीत प्रश्न विचारणारा विद्यार्थी, प्रामाणिकपणे शिकवणारा शिक्षक, गुणवत्तेला प्राधान्य देणारी संस्था आणि शिक्षणाला खर्च नव्हे तर राष्ट्राच्या भविष्यावरील गुंतवणूक मानणारे शासन..या चौघांच्या एकत्रित प्रयत्नातूनच सक्षम भारत घडू शकतो. शिक्षणात गुंतवलेला प्रत्येक रुपया हा केवळ एका विद्यार्थ्यावरचा खर्च नसतो तर तो राष्ट्राच्या प्रगतीचा, लोकशाहीच्या बळकटीचा आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असतो.

चला, आजच एक सामूहिक संकल्प करूया..महाविद्यालये रिकामी होऊ देणार नाही, विद्यार्थ्यांची स्वप्ने विझू देणार नाही आणि शिक्षणाला बाजाराचा नव्हे तर समाज परिवर्तनाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि राष्ट्रनिर्मितीचा सर्वात प्रभावी आधार बनवूया. कारण रस्ते, पूल आणि इमारती राष्ट्राला आकार देतात; पण विचार, संशोधन आणि शिक्षणच राष्ट्राला चरित्र, सामर्थ्य आणि भविष्य देतात. शिक्षण वाचले तरच विचार वाचतील,विचार वाचले तरच लोकशाही वाचेल; आणि लोकशाही वाचली तरच भारताचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित राहील, मित्रांनो..

टीप : वरील लेख हा संकलित माहितीवर आधारित आणि वास्तव परिस्थितीला गृहीत धरून संपादित करण्यात आलेला आहे.

-एक शिक्षणप्रेमी.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार

🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन

#शिक्षण #उच्चशिक्षण #शिक्षणाचा_बाजार #भविष्याचा_लिलाव #महाविद्यालये #महाविद्यालयेवाचवा #शिक्षणवाचवा #विद्यार्थी #विद्यार्थ्यांचाभविष्य #शिक्षणसुधारणा #राष्ट्रनिर्मिती #संशोधन #वैज्ञानिकदृष्टिकोन #बेरोजगारी #पेपरफुटी #लोकशाही #संविधान #प्रबोधन #विचार #मराठी #education #HigherEducationMinister #EducationReform #saveeducationsavesind #SaveColleges #StudentsProtest #studentvoiceandchoice #FutureOfIndia #YouthPowerNationPower #research #innovations #ScientificTemper #𝖲𝗄𝗂𝗅𝗅𝖣𝖾𝗏𝖾𝗅𝗈𝗉𝗆𝖾𝗇𝗍 #Employment #publiceducationmatters #educationpoliy y #PaperLeak #AI #digitaleducationhub #NationBuilding #KnowledgeIsPower #ThinkCritically #EducateToEmpower #TheRadicalHumanist #DrKalamFoundation #विद्यार्थीमित्र #Parbhani #Maharashtra #India #trendingchallenge