नुकतंच जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ आणि काही स्वयं-चलित परीक्षा मंडळ समूहातील शाळांनी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 8 वी ते 10 वी वर्गांच्या प्रथम सत्र परीक्षेचं आयोजन जाहीर केलं आहे. 

ही परीक्षा केवळ औपचारिकता नाही; तर आपल्या मेहनतीचं, शिस्तीचं आणि आत्मविश्वासाचं जिवंत मूल्यांकन आहे. या परीक्षेतून आपण केवळ गुण मिळवत नाही, तर आपली शैक्षणिक प्रगती आणि पुढील भविष्याची पायाभरणी घडवत असतो.

त्यामुळे ह्या परीक्षेकडे भीतीने नव्हे तर संधीने बघा.. कारण हिच खरी वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि आपल्या स्वप्नांना उज्ज्वल दिशा देण्याची. 

विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची धावपळ नाही; ती तर तुमच्या तयारीची, शिस्तीची आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी आहे. जशी खेळाडू स्पर्धेपूर्वी सराव करतो, तशीच परीक्षा ही तुमच्या ज्ञानाचा सराव मैदान आहे. भीती न बाळगता योग्य पद्धतीने अभ्यास केला, तर प्रथम सत्राची परीक्षा ही तुमच्यासाठी एक सुंदर संधी ठरेल – स्वतःला सिद्ध करण्याची, उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल टाकण्याची. 

🎯 परीक्षा तयारीसाठी सोप्या गोष्टी मित्रांनो.. ✍️

1. अभ्यासाचा ठराविक वेळ ठेवा.
रोज ठराविक वेळेला अभ्यासाला बसण्याची सवय लावा. आपलं अभ्यास नियोजन आवश्यक आहे..सकाळी लवकरचा वेळ सर्वात चांगला.

2. लहान-लहान तुकड्यांत अभ्यास करा.
एकदम 3-4 तास अभ्यास न करता, 40-45 मिनिटांच्या सत्रात अभ्यास करा आणि मध्ये 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या.

3. महत्त्वाचे धडे आधी पूर्ण करा.
कठीण वाटणारे धडे टाळू नका. उलट आधी तेच सोडवा. सोपे धडे नंतरही जमतील.

4. लेखन सराव आवर्जून करा.
फक्त वाचून अभ्यास नको. उत्तरं स्वतः लिहून बघा. यामुळे आठवण पक्की होते आणि परीक्षेत उत्तरं पटकन सुचतात.

5. प्रश्नपत्रिका सोडवा.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्न, घटक चाचणीचे पेपर्स सोडवा. वेळेचं नियोजन शिकायला मदत होते.

6. सारांश नोट्स तयार करा.
महत्वाचे सूत्र, व्याख्या, घटना, तारखा, समीकरणं, शॉर्टकट पॉइंट्स स्वतःच्या वहीत लिहून ठेवा. लेखन सराव हीं महत्वाचा आहे मित्रांनो,शेवटी तीच “रिव्हिजन वही” कामाला येते.

7. गटात अभ्यास करा. (पण शिस्तीत)
मित्रांसोबत अभ्यास करताना परस्पर प्रश्न विचारा, शंका विचारून उत्तरं काढा. पण गप्पांचा अड्डा होऊ देऊ नका.

8. आरोग्य जपा.
झोप पुरेशी घ्या (किमान 7-8 तास). जास्त चहा, कॉफी टाळा. हलका, पौष्टिक आहार घ्या. थोडं व्यायाम / चालणेही महत्वाचं आहे.

9. शेवटच्या आठवड्यात नवा धडा सुरू करू नका.
जे वाचलं आहे त्याचं पुन्हा-पुन्हा पुनरावलोकन करा. Confidence वाढतो.

10. परीक्षेच्या दिवशी...
प्रश्नपत्रिका नीट वाचा.
वेळेचे 3 भाग करा: सोपे प्रश्न → मध्यम → कठीण.
उत्तरं स्वच्छ, मुद्देसूद लिहा.

परीक्षा म्हणजे भीती नव्हे, तर तुमच्या मेहनतीची परिक्षा आहे.
शिस्तबद्ध तयारी = चांगला निकाल..

विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं यश हे फक्त गुणांच्या चौकटीत मर्यादित नसतं; ते आपल्या शिस्तीचं, आत्मविश्वासाचं आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फळ असतं. प्रश्नपत्रिका कठीण असो वा सोपी – खरी परीक्षा म्हणजे आपण घाबरलो नाही, हार मानली नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंजलो. म्हणून मेहनतीवर विश्वास ठेवा, आत्मविश्वासाने पावले टाका आणि खात्री बाळगा – तुमच्या ज्ञानाचा प्रकाश नक्कीच उजळून दिसेल. 

परीक्षेच्या पूर्व-तयारीला लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा मित्रांनो..

आपलाच स्नेही मार्गदर्शक..🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in/?m=1
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻