दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. परीक्षा जशी जवळ येते, तशी विद्यार्थ्यांच्या मनात भीती, दडपण आणि अस्वस्थता घर करू लागते. हीच अस्वस्थता जर वेळेत ओळखली नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या मानसिकतेसोबतच आरोग्यावरही परिणाम करू शकते. म्हणूनच या काळात केवळ अभ्यास नव्हे, तर मन, शरीर आणि विचार यांचीही योग्य काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.
सर्वात आधी विद्यार्थ्यांनी एक गोष्ट मनाशी ठामपणे पक्की करावी की ही परीक्षा आयुष्यातील शेवटची कसोटी नाही. “याच परीक्षेवर माझे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे.” हा विचार मनातून हळूहळू बाजूला ठेवायला हवा. परीक्षा महत्त्वाची आहे, पण आयुष्य त्याहून मोठे आहे. स्वतःची तुलना इतर विद्यार्थ्यांशी करणे टाळावे. कारण प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी असते. कोणी ग्रामीण भागातून आलेले असतात, कोणी शहरी; कोणी क्लासेस, तर कोणी स्वअभ्यासावर अवलंबून असतात. त्यामुळे तुलना नव्हे, तर स्वतःची प्रगती हाच मापदंड असावा.
“मी मागे पडेन”, “मला कमी गुण मिळतील” असे नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नयेत. त्याऐवजी “मी प्रयत्नशील आहे”, “मी सक्षम आहे”, “मी यश मिळवू शकतो” ही सकारात्मक भावना मनात रुजवावी. या टप्प्यावर पालक आणि गुरुजनांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दडपण न देता विश्वास, समजूतदारपणा आणि प्रोत्साहन यांचा आधार घ्यावा.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा आहार, झोप आणि दिनक्रम यांचे योग्य नियोजन असणे अत्यावश्यक आहे. पुरेशी झोप न घेतल्यास अभ्यासावर परिणाम होतो आणि मन चिडचिडे होते. त्यामुळे पालकांनीही जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या झोपेकडे लक्ष द्यावे. प्रसारमाध्यमे, शैक्षणिक चॅनेल्स, मोबाईल यांचा वापर ठरावीक वेळेत आणि ठरावीक उद्देशासाठीच करावा. कोणते चॅनेल पाहायचे, कोणते प्रश्न वाचायचे, कोणत्या विषयाला जास्त वेळ द्यायचा याचे नियोजन आधीच ठरवले, तर गोंधळ टळतो.
मानसिक ताजेतवानेपणासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार थोडा व्यायाम, एखादा खेळ किंवा हलके फुलके मनोरंजन जरूर करावे. सतत अभ्यासात बुडून राहण्यापेक्षा थोडी विश्रांती मनाला बळ देते आणि अभ्यासाची परिणामकारकता वाढवते.
या सगळ्याबरोबरच अभ्यासाचे नियोजन हा यशाचा कणा आहे,विद्यार्थी मित्रांनो.. आजपासून जरी मन लावून अभ्यासाला सुरुवात केली, तरी यश हातातून निसटणार नाही, याची खात्री बाळगावी. प्रत्येक विषयासाठी परीक्षेपर्यंतचे स्पष्ट वेळापत्रक तयार करावे. सर्व विषयांना शक्यतो समान वेळ द्यावा. काही विषय अवघड वाटत असतील, तर त्यांना थोडा अधिक वेळ देणे चुकीचे नाही.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या प्रश्नपत्रिका जमा कराव्यात आणि त्या समजून घ्याव्यात.. सुरुवातीला बोर्डाच्या वेळेनुसार घरी बसून प्रश्नपत्रिका पुस्तक, नोट्स, गाईड यांच्या मदतीने सोडवाव्यात, पण वेळेचे बंधन पाळणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक विषयाच्या किमान पाच प्रश्नपत्रिका अशा प्रकारे सोडवल्यानंतर पुढील प्रश्नपत्रिका कोणतेही साहित्य न वापरता वेळ लावून सोडवाव्यात. सोडवलेल्या प्रश्नपत्रिका विषय शिक्षकांकडून तपासून घ्याव्यात आणि झालेल्या चुका प्रामाणिकपणे दुरुस्त कराव्यात.
ज्या धड्यांमध्ये अडचण वाटते, त्यावर अति वेळ घालवण्याऐवजी सोपे आणि आत्मविश्वास देणारे धडे आधी पूर्ण करावेत. कारण प्रश्नपत्रिकेत पर्याय असतात. प्रत्येक विषयासाठी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न यांची एक छोटी नोटबुक तयार करून ती रोज नजरेखालून घालावी.
परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर ती शांतपणे, नीट वाचावी आणि समजून घ्यावी. घाई न करता उत्तर लिहायला सुरुवात करावी. घेतलेल्या प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्न पूर्ण करावेत. गणित, विज्ञान, भूमिती, भौतिकशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये आकृत्या काढताना पेन्सिलचा वापर करावा. उत्तरपत्रिका लिहिताना प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरू करणे अधिक योग्य ठरते.
अशा प्रकारे अभ्यास, आरोग्य आणि मानसिकतेचे संतुलित नियोजन केले, तर यश नक्कीच दूर राहणार नाही. परीक्षा केवळ गुणांची नव्हे, तर शिस्त, संयम आणि आत्मविश्वासाची कसोटी असते. आत्मविश्वास बाळगा, सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश आपोआप तुमच्याकडे चालत येईल,मित्रांनो घाबरू नका.. आम्ही सर्वं सदैव आपणा सोबतच आहोत..
शेवटी एवढेच लक्षात ठेवा, परीक्षा म्हणजे तुमच्या कुवतीवरचा अंतिम शिक्का नाही, तर तुमच्या प्रयत्नांचा एक टप्पा आहे. आज तुम्ही जे शिकत आहात, जे झेलत आहात, जे सहन करत आहात तेच उद्या तुम्हाला अधिक सक्षम, अधिक परिपक्व आणि अधिक आत्मविश्वासू बनवणार आहे. गुण येतीलच, पण त्याहून मौल्यवान गोष्ट म्हणजे या काळात घडणारा तुमचा स्वभाव, तुमची शिस्त आणि तुमचा आत्मविश्वास. संकटांमध्येही शांत राहून पुढे जाण्याची ताकद हीच खरी शिदोरी आहे.
विद्यार्थी मित्रांनो, अपयशाची भीती मनात ठेवू नका. प्रयत्न करणारा विद्यार्थी कधीच हरत नाही. कधी निकाल अपेक्षेप्रमाणे नसतो, पण प्रयत्न व्यर्थ जात नाहीत. आयुष्याच्या मोठ्या परीक्षा अजून बाकी आहेत आणि त्यासाठी तुम्ही आज तयार होत आहात. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या क्षमतेची जाणीव ठेवा आणि मनापासून अभ्यासाला सामोरे जा. तुमचा संघर्षच उद्याच्या यशाची पायाभरणी करतो आहे.
आणि हो, या प्रवासात तुम्ही एकटे नाहीत. तुमचे पालक, गुरुजन, शुभेच्छुक आणि समाज तुमच्या पाठीशी उभा आहे. धीर ठेवा, घाबरू नका, डोळ्यांत स्वप्नं आणि मनात धैर्य ठेवा. परीक्षा येतील आणि जातील, पण तुम्ही उभे राहिलात, प्रयत्नशील राहिलात, तर यश तुमच्यापर्यंत येणारच. आज मेहनत करा, उद्या अभिमानाने उभे राहा. आम्ही सर्वजण सदैव तुमच्यासोबत आहोत.
परीक्षेच्या तयारीसाठी मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि यशस्वी भव..!
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
- विचार संकलन, लेखन आणि संपादन.. ✍️
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#परीक्षा #परीक्षेचीतयारी #दहावी #बारावी #विद्यार्थीजीवन #विद्यार्थीमित्र #अभ्यास #अभ्यासनियोजन #यश #यशाचीशिदोरी #आत्मविश्वास #मानसिकआरोग्य #तणावमुक्तअभ्यास #प्रेरणा #प्रबोधन #वैचारिकलेखन #शैक्षणिकलेख #पालकआणिगुरु #शिस्तआणिसातत्य #स्वअभ्यास #ExamPreparation #BoardExams #StudentMotivation #StudyTips #MentalHealthMatters #PositiveThinking #BelieveInYourself #EducationForLife #InspireEducateEmpower #TheSpiritOfZindagi
0 Comments