परीक्षेचा काळ म्हणजे केवळ प्रश्नपत्रिकांचा नव्हे, तर संपूर्ण घरगुती वातावरणाचा कस पाहणारा काळ असतो. या काळात घरात केंद्रस्थानी असावा तो विद्यार्थी. त्याचा अभ्यास, त्याचे मन, त्याचे आरोग्य आणि त्याचा आत्मविश्वास या सगळ्यांचा समतोल राखणे ही पालकांची पहिली जबाबदारी आहे. परीक्षा सुरू असताना घरात लग्नसमारंभ, प्रवास, मोठी नियोजनं किंवा अवांतर कामांची लगबग नसावी. विद्यार्थ्याला अभ्यासापासून दूर नेणारी प्रत्येक गोष्ट टाळली पाहिजे. कारण मुलं अभ्यास टाळण्यासाठी कारणं शोधतच असतात; त्यांना कारणं न मिळू देणं हीच खरी पालकत्वाची कसोटी आहे.

परीक्षा काळात मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आजारपण, थकवा, अस्वस्थता या सगळ्या गोष्टी अभ्यासावर परिणाम करतात. उकळलेले किंवा फिल्टरचे पाणी, ताजे व हलके अन्न, अति थंड किंवा जड पदार्थ टाळणे ही साधी पण महत्त्वाची काळजी आहे. या काळात वाहन चालवण्यास मज्जाव करणेही आवश्यक आहे, कारण मानसिक तणाव अपघातांना आमंत्रण देतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निकाल काहीही आला तरी तो स्वीकारण्याची मानसिक तयारी पालकांनी आधी करायला हवी. गुणांच्या आधारावर मुलांवर राग काढणे म्हणजे त्यांच्या मनावर कायमची जखम देणे होय.

फेब्रुवारी आणि मार्च हे महिने आज बहुतेक घरांमध्ये तणावाचे प्रतीक झाले आहेत. प्रत्यक्षात हा तणाव दिवाळीनंतरच हळूहळू जमा होत जातो. भवितव्याची भीती, करिअरची धास्ती आणि समाजाची अपेक्षा यांचा भार पालकांच्या मनावर जास्त असतो. “आपला दिवटा काय करणार?” या चिंतेत पालक स्वतःच अस्वस्थ होतात. शिक्षकांनाही शाळेच्या निकालाची चिंता असते. पण ज्यांच्या आयुष्याशी हे थेट जोडलेले असते, ते विद्यार्थी मात्र अनेकदा निवांत दिसतात. अभ्यासाऐवजी मोबाईल, करमणूक आणि चोचल्यांत रमलेली पिढी आज सर्वत्र दिसते. अशा वेळी “अभ्यास कर” म्हणणारे पालक आणि मार्गदर्शन करणारे शिक्षक मुलांना शत्रूसारखे वाटू लागतात. ही दरी वाढत चालली आहे, हे वास्तव स्वीकारावेच लागेल.


आजची कुटुंबव्यवस्था बदलली आहे. एक किंवा दोनच मुले, तीही प्रचंड लाडात वाढलेली. लहानपणी हट्ट छोटे असतात, पण वय वाढतं तसं हट्टही मोठे होतात. ते पूर्ण करताना अनेक पालक आर्थिक अडचणीत सापडतात. कॉलेज, क्लास, गाडी, मोबाईल, पॉकेट मनी यामध्ये पालकांची अर्थव्यवस्था ढासळते. आणि हट्ट पूर्ण झाले नाहीत तर काही मुलं टोकाची पावलं उचलतात, हे समाजासाठी गंभीर इशारे आहेत.

याच काळात समाजातील आणखी एक मोठी पोकळी प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे घरातील वृद्धांची अनुपस्थिती. आजी-आजोबा हे केवळ प्रेम देणारे नाहीत, तर संस्कारांचे चालते-बोलते विद्यापीठ असतात. छत्रपती शिवरायांच्या जीवनाकडे पाहिले तर जिजाऊ माँसाहेबांनी घडवलेले संस्कार स्पष्ट दिसतात. आज मात्र आई-वडील दोघेही ‘मोहिमेवर’ आणि मुलांवर संस्कार करतो तो टीव्ही किंवा मोबाईल. काही पालक मुलांना रेसिडेन्शियल स्कूलमध्ये ठेवून जबाबदारीतून मोकळे झाल्याचा सुस्कारा सोडतात; पण त्यातून निर्माण होणारी भावनिक दुरावस्था भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकते.

या सगळ्या परिस्थितीत परीक्षा टाळता येत नाहीत आणि ताण वाढणारच आहे. प्रश्न आहे तो व्यवस्थापनाचा. हे व्यवस्थापन शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे करणे आवश्यक आहे.

शिक्षकांनी परीक्षेच्या काळात केवळ अभ्यासक्रम संपवण्याची घाई न करता विद्यार्थ्यांच्या मनाचा विचार करायला हवा. सतत चिडचिड, दबाव आणि तुलना यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खचतो. मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेल्या मुलांना शिकवताना आपुलकी, विश्वास आणि संवाद या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची कुवत वेगळी असते, हे ओळखून त्याला झेपेल तेवढेच समजावून सांगणे, सरावाची सोपी आणि आकर्षक पद्धत तयार करणे हे शिक्षकांचे खरे कसब आहे. शिक्षक हा केवळ विषय शिकवणारा नसून, जीवनातील अडचणींवर मार्गदर्शन करणारा आधारस्तंभ आहे, असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे.

पालकांची भूमिका तर याहूनही व्यापक आहे. केवळ चांगली शाळा, चांगले क्लासेस आणि सुविधा दिल्याने मुलं घडत नाहीत. मुलांच्या जीवनात मित्रत्वाच्या नात्याने उपस्थित राहणे फार महत्त्वाचे आहे. पालकांनी आपली परिस्थिती मुलांना समजावून सांगितली, तर मुलंही अवाजवी अपेक्षा करत नाहीत. घरात शांतता, संवाद आणि विश्वासाचे वातावरण असेल तर मुलं आपले प्रश्न, चुका आणि भीती पालकांशी मोकळेपणाने शेअर करतात. मोबाईल हा शत्रू नाही, तो योग्य वापरात आणणे ही कला शिकवावी लागते. त्याच मोबाईलवर शिक्षणाचे अमाप साधनसंपत्ती उपलब्ध आहे, हे मुलांना पटवून द्यावे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मुलाची कुवत आणि आवड ओळखून त्यानुसार त्याला शिकू द्यावे. आज केवळ पारंपरिक शिक्षण नव्हे, तर कौशल्यांना मोठे मोल आहे. गाणे, नृत्य, कुकिंग, डिझाईन, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत संधी आहेत. तुलना करू नका, दबाव टाकू नका, तर मार्ग दाखवा.


व्यसनाधीनतेसारख्या गंभीर प्रश्नांवर रागाने नव्हे, तर समजुतीने आणि तज्ज्ञांच्या मदतीने उपाय शोधले पाहिजेत. मारहाण किंवा अपमान याने प्रश्न सुटत नाहीत, ते अधिक बळावतात.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही, अनावश्यक मित्रमंडळी यापासून थोडे दूर राहिले पाहिजे. जेवढा अभ्यास झाला आहे तो पक्का करणे, जेवढे येते तेवढे नीट लिहिणे आणि अपयशाच्या भीतीपेक्षा प्रयत्नांवर विश्वास ठेवणे हेच यशाचे सूत्र आहे.

शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिन्ही बाजूंनी समतोल, समजूतदार आणि संवेदनशील व्यवस्थापन झाले, तर कोणतीही अवघड परीक्षा अवघड राहत नाही. परीक्षा ही आयुष्याची अंतिम परीक्षा नाही, पण आयुष्य घडवणाऱ्या प्रवासातील एक महत्त्वाची पायरी नक्कीच आहे. ती पायरी भीतीने नव्हे, तर विश्वासाने चढली पाहिजे.

अखेर परीक्षा म्हणजे मुलांच्या बुद्धिमत्तेचीच नव्हे, तर आपल्या पालकत्वाची, शिक्षकत्वाची आणि समाजाच्या संवेदनशीलतेचीही परीक्षा असते. गुणपत्रिकेपेक्षा माणूस मोठा आहे, हे आपण विसरलो तर शिक्षणाचा खरा अर्थच हरवतो. आत्मविश्वास, मूल्ये, कुवत ओळखण्याची दृष्टी आणि अपयश पचवण्याची ताकद हीच खरी शैक्षणिक शिदोरी आहे. ती जर या काळात मुलांच्या हाती दिली, तर कोणताही निकाल त्यांना आयुष्यात हरवू शकत नाही.

आज गरज आहे ती एकमेकांवर दोष ठेवण्याची नव्हे, तर जबाबदारी वाटून घेण्याची. शिक्षकांनी मार्गदर्शक व्हावे, पालकांनी आधार व्हावे आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील व्हावे. या तिन्ही घटकांमध्ये विश्वास, संवाद आणि समजूत असेल तर परीक्षा तणावाचा विषय न राहता आत्मपरीक्षणाची संधी ठरते. अशा वातावरणात घडलेली पिढी केवळ नोकरीसाठी नव्हे, तर जीवनासाठी सज्ज होते.

म्हणूनच परीक्षा जिंकण्यापेक्षा मुलांना हरू न देणे हेच आपले अंतिम ध्येय असावे. गुण कमी आले तरी चालतील, पण मनोबल खचू देऊ नका. कारण आज ज्यांच्या हातात आपण विश्वास देतो, उद्या त्याच हातांनी समाज घडणार आहे. परीक्षा संपतील, निकाल लागतील; पण आज दिलेले संस्कार मात्र आयुष्यभर साथ देणारे असतात.


धन्यवाद मित्रांनो.. 🙏

- विचार संकलन, लेखन आणि संपादन.. ✍️
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र.. 
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार

🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel

🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन

#परीक्षा #परीक्षाकाळ #परीक्षातणाव #विद्यार्थी #पालकत्व #संस्कार #शिक्षण #शैक्षणिकमार्गदर्शन #पालकांचीभूमिका #शिक्षकांचीभूमिका #विद्यार्थीजीवन #मानसिकआरोग्य #आत्मविश्वास #कौटुंबिकसंवाद #मूल्यशिक्षण #समाजभान #आजचेशिक्षण #मोबाईलआणिशिक्षण #व्यसनमुक्ती #करिअरमार्गदर्शन #कौशल्यविकास #तुलनाटाळा #प्रेरणादायीलेखन #वैचारिकलेख #प्रबोधन #शिक्षणविचार #मानवीमूल्ये #पालकआणिशिक्षण #शाळाआणिसमाज #विद्यार्थीमित्र #शिक्षणसंस्कार #भविष्यनिर्मिती #जबाबदारीचीशिक्षणव्यवस्था