आनंददायी, अनुभवाधारित आणि जीवनोपयोगी शिक्षण उपक्रम..

“शाळेबाहेरचे जग हीच खरी प्रयोगशाळा,अनुभव हेच खरे शिक्षक!”

शालेय शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तके, परीक्षा आणि गुण नव्हेत. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, व्यवहारज्ञान, आर्थिक साक्षरता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक संवेदनशीलता आणि जबाबदार नागरिकत्व विकसित करणे हाही शिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

म्हणूनच उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता, जीवनातील नवी कौशल्ये शिकण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवण्यासाठी करूया.

या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी पुढील 32अनुभवाधारित उपक्रम सुचविण्यात येत आहेत...

🔰 स्वावलंबन आणि जीवनकौशल्ये... ✍️

१. आठवड्याच्या भाजीपाल्याची खरेदी करून दर, वजन आणि खर्चाची नोंद ठेवा.

२. पालकांसोबत बँकेत जाऊन पैसे जमा करणे, काढणे, पासबुक आणि डिजिटल बँकिंग समजून घ्या.

३. रेल्वे तिकीट आरक्षण, प्रवासाचे नियोजन आणि तिकीटावरील माहिती समजून घ्या.

४. स्वतःची अभ्यासाची जागा, कपाट आणि घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा.

५. घरातील ज्येष्ठांच्या मदतीने साधे पदार्थ बनवायला शिका.

६. स्वतःचे कपडे धुणे, वाळवणे, घडी घालणे आणि व्यवस्थित ठेवणे शिका.

७. घरातील दैनंदिन कामांमध्ये सहभागी होऊन श्रमप्रतिष्ठा आणि समान जबाबदारीची जाणीव विकसित करा.

🔰आर्थिक साक्षरता आणि व्यवहार ज्ञान..✍️

८. घरातील वीजबिल वाचून वीजवापर आणि खर्चाचा अभ्यास करा.

९. धान्य बाजाराला भेट देऊन विविध धान्यांचे दर, प्रकार आणि पौष्टिक मूल्य जाणून घ्या.

१०. आठवडाभराच्या वैयक्तिक खर्चाची नोंद करून बचतीचे नियोजन करा.

११. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर, दुरुस्ती किंवा पुनर्विक्री यांचे महत्त्व समजून घ्या.

🔰श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक वास्तव.. ✍️

१२. सायकल दुरुस्ती केंद्र, गिरणी, बेकरी, पुस्तकांचे दुकान किंवा शेतीला भेट देऊन व्यवसायांची माहिती मिळवा.

१३. आपल्या आवडीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची भेट घेऊन करिअरविषयक माहिती मिळवा.

१४. सफाई कर्मचारी, शेतमजूर, बांधकाम कामगार आणि इतर कष्टकरी व्यक्तींच्या कामाचे महत्त्व समजून घ्या.

१५. सामाजिक कार्यकर्ते किंवा सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून वंचित घटकांच्या समस्या जाणून घ्या.

🔰कुटुंब, संस्कार आणि संवाद कौशल्ये... ✍️

१६. आई-वडील किंवा आजी-आजोबांची मुलाखत घेऊन त्यांच्या बालपणातील आठवणी आणि जीवनानुभव लिहा.

१७. कुटुंबातील किमान तीन पिढ्यांचा वंशवृक्ष तयार करा.

१८. घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून एखादे पारंपरिक कौशल्य, पदार्थ किंवा हस्तकला शिका.

🔰आरोग्य, क्रीडा आणि निसर्ग.. ✍️

१९. दररोज चालणे, योगासने, सूर्य नमस्कार किंवा योग्य व्यायाम करा.

२०. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल यांसारख्या किमान दोन मैदानी खेळांचा अनुभव घ्या.

२१. ऐतिहासिक स्थळ, किल्ला, संग्रहालय किंवा पर्यटनस्थळाला भेट देऊन माहिती संकलित करा.

२२. मित्रांसह सुरक्षित परिसरात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबवा.

२३. परिसरातील किमान दहा झाडे, पक्षी, फुलपाखरे किंवा इतर सजीवांची माहिती संकलित करा.

🔰भूगोल, इतिहास आणि नागरिकत्व.. ✍️

२४. आपल्या घराच्या आसपासच्या परिसराचा नकाशा तयार करून शाळा, बाजारपेठ, बँक, दवाखाना आणि सार्वजनिक ठिकाणे दर्शवा.

२५. भारताचा नकाशा काढून राज्ये, राजधानी आणि इतिहासातील चार प्रसिद्ध लढायांची ठिकाणे दाखवा.

२६. ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करा.

🔰विज्ञान, तंत्रज्ञान आणि डिजिटल साक्षरता..

२७. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, अंतराळ संशोधन किंवा अक्षय ऊर्जा यांपैकी एका विषयावर 5 ते 10 स्लाइड्सचे सादरीकरण तयार करा.

२८. डिजिटल बँकिंग, ऑनलाइन व्यवहार, सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्याचे मार्ग समजून घ्या.

२९. सोशल मीडियावरील तीन माहितीपूर्ण दाव्यांची विश्वासार्ह स्रोतांच्या आधारे सत्यता पडताळा.

🔰समाजप्रबोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन..

३०. राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा अन्य समाजप्रबोधन करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा अभ्यास करा.

३१. प्लास्टिक प्रदूषण, पाणीटंचाई, शालेय गळती किंवा सार्वजनिक स्वच्छता यांपैकी एका सामाजिक समस्येचा अभ्यास करून उपाय सुचवा.

३२. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध स्पष्ट करा.

🔰 उपक्रमाची अंमलबजावणी आणि मूल्यमापन...

प्रत्येक विद्यार्थ्याने सर्व 32 उपक्रम करणे बंधनकारक नसावे. वयोगट, आवड, उपलब्ध सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन किमान 8 उपक्रमांची निवड करावी.

🎓सुचवलेले मूल्यमापन : एकूण ३० गुण..

- अनुभववही व नोंदी – १० गुण
- प्रत्यक्ष कृती व सादरीकरण – १० गुण
- सामाजिक जाणीव, सर्जनशीलता व स्वमूल्यमापन – १० गुण

🔰अनुभववहीत काय लिहावे..?

प्रत्येक उपक्रमासाठी पुढील नोंदी कराव्यात.

१. उपक्रमाचे नाव व दिनांक.
२. केलेली तयारी आणि प्रत्यक्ष कृती.
३. मिळालेला अनुभव आणि नवीन ज्ञान.
४. आलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाय.
५. या अनुभवाचा भविष्यातील उपयोग.
६. स्वतःचे मत आणि चिंतन.

🎓 टीप : मूल्यमापनाचे हे केवळ सुचवलेले प्रारूप आहे. शाळांनी संबंधित मंडळाचे नियम तपासावेत. आर्थिक परिस्थिती, इंटरनेटचा अभाव किंवा अन्य अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्व उपक्रम पालक किंवा शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षिततेच्या नियमांनुसार करावेत.

🔰पालक आणि शिक्षकांसाठी विशेष आवाहन.. 🙏

मुलांना केवळ गृहपाठ देण्याऐवजी जीवनपाठ देऊया..!

बाजारात खरेदी करताना गणित शिकता येते, बँकेत व्यवहार करताना अर्थशास्त्र समजते, ज्येष्ठांशी संवाद साधताना इतिहास जिवंत होतो आणि कष्टकरी व्यक्तींच्या अनुभवातून श्रमप्रतिष्ठेचे मूल्य शिकता येते.

" शिक्षणाने केवळ हुशार विद्यार्थी नव्हे, तर स्वावलंबी, विवेकशील, संवेदनशील, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले आणि सामाजिक जबाबदारी जाणणारे नागरिक घडले पाहिजेत."

पाठ्यपुस्तक ज्ञान देते, अनुभव समज देतो आणि विवेक त्या ज्ञानाचा योग्य वापर करायला शिकवतो!

चला, सुट्टीला केवळ विरंगुळा न ठेवता स्वावलंबन, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जीवनकौशल्यांच्या विकासाची संधी बनवूया..!

- एक शिक्षण अभ्यासक आणि समाजप्रबोधक.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन