क शिक्षण महर्षी...!

🎓 मौलाना अबुल कलाम आझाद

राष्ट्रीय शिक्षण दिन विशेष..

11 नोव्हेंबर हा  मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस "राष्ट्रीय शिक्षण दिन" म्हणून 2008 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्या शैक्षणिक विचारांची व कार्याची ओळख.

 दीडशे वर्षाच्या ब्रिटिश सत्तेचा लय होऊन दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा तिरंगा ध्वज आभाळी फडकला आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या मंत्री मंडळात भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव झळकले. 

शिक्षणावर प्रेम असणारा, बहुभाषा पंडित आणि राजकारणात असून ही तत्वचिंतनाची बैठक असणारा एक सामाजिक विचारवंत अशी आझाद यांची प्रतिमा होती.

स्वतंत्र भारताचा विकास त्यांचे सर्वांगांनी उन्नयन आणि त्यांच्या सर्व आशा आकांक्षाचे स्वप्न साकार करण्याचे मार्ग या दृष्टीने शिक्षण खात्यावर मोठी जबाबदारी होती. स्वतंत्र भारताची स्वप्न साकार करणारी कार्यशाळा म्हणून शिक्षणाकडे बघितले जात होते. या शिक्षण रथाचा सारथी असाच सक्षम हवा होता. पंडितजींनी मौलानांची योजना यासाठीच केली होती.

दि. 11 नोव्हेंबर 1888 मध्ये मक्का येथे आझाद यांचा जन्म झाला.त्यांचं मूळ नाव मोईउद्दीन अहेमद असं होत . अबुल कलाम ही वाचस्पती या अर्थाची पदवी आहे. पुढे मोईउद्दीन अहेमद हे स्वतःच स्वतःच्या लेखनासाठी आझाद हे टोपणनाव लावू लागले. अशा तऱ्हेने मोईउद्दीन अहेमद यांचे मौलाना अबुल कलाम आझाद झाले.

सॅन 1890 साली आझाद यांचे वडील सहकुटुंब कोलकात्याला आले. आणि छोट्या मोईउद्दीन ने पारंपरिक शिक्षणाद्वारे पारशी, उर्दू , अरबी  या भाषांचा अभ्यास केला.पुढे तर्कशास्त्र , इस्लामधर्म , तत्वज्ञान  व गणित यांचाही अभ्यास त्यांनी केला. सर सय्यद अहेमद खान यांचे काही लेख वाचनात आले आणि त्यांचा परिणाम म्हणून आझाद इंग्रजी शिकले.

सन 1908  मध्ये आझाद यांनी इजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, इत्यादी देशांना भेटी दिल्या. या प्रवासात काही क्रांतिकारकांशी त्यांच्या भेटी झाल्या. 

सन 1912 साली लोकजागृती साठी अल-हिलाल हे साप्ताहिक आझाद यांनी सुरु केले. 

यामध्ये राजकीय मते प्रखरपणे मांडण्यात येत असत. ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून 10,000 /- इतका जामीन मागितला.आझाद यांनी जामीन देण्याचे नाकारले. आणि अल-हिलाल हे साप्ताहिक बंद पडले.

 स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्या मुळे आझादांवर अनेक प्रांतात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यांना सांची येथे स्थानबद्ध करण्यात आले. अनेक वर्षानंतर सन 1920 साली त्यांची सुटका झाली. सन 1921 मध्ये पुन्हा अटक झाली. आणि एका वर्षानंतर सुटका झाली.1923  मध्ये दिल्ली येथे भरलेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष आझाद हे होते.

1930 मध्ये आझाद यांनी असहकाराच्या आंदोलनाबद्दल पुन्हा अटक झाली. 

1939 ते 1946 या काळात काँग्रेस चे अध्यक्ष होते. 1942 साली महात्मा गांधीजी प्रणित चलेजाव आंदोलन सुरु झाले. या आंदोलनात मौलाना अबुल कलाम आझाद ही सामील झाले. 1943 ची सर स्टफर्ड क्रिप्स यांची योजना 1945 ची लॉर्ड वेव्हेल यांची शिमला परिषद त्याच सुमारास आलेले ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ या सर्वांबरोबर पुढाकार घेऊन आझाद यांनी काँग्रेसतर्फे बोलणी केली.

         
स्वातंत्र्य सूर्य उगवला. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे देशाचे पहिले शिक्षणमंत्री झाले. आझाद हे प्रभावी वक्ते व लेखक होते. आझाद यांनी बरीच पुस्तके लिहिले. त्यात तजकेरा, गुब्बारे खातीर , कौले फैसल , दास्ताने करबला, तर्जुमानुल कोरान.

 🎓 मौलाना अबुल कलाम यांचे शैक्षणिक विचार:

समाजाचे जबाबदार घटक म्हणून वागण्याची वृत्ती निर्माण करणे , कृतिशील सहजीवनाची सवय होणे, आणि समाज कल्याणाची आस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट होय.

शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे शिक्षणाचे स्थर अत्यंत महत्वाचे असून याच काळात व्यक्तीविकास , समाजविकास यांचा पाय भक्कम होतो.

 विज्ञानाने जगाचे भौतिक अंतर कमी केले असले तरी माणसातील दरी कमी करण्यात विज्ञान अयशस्वी झाले आहे. ते कार्य शिक्षणाचं करेल. राजकीय व्यावसायिक सर्वच क्षेत्रात नैतिकतेची आवश्यकता असल्यामुळे शिक्षणाद्वारे नैतिकतेची रुजवण होने आवश्यक आहे.

 मौलाना आझाद यांचे विचार आजही ताजे उपयुक्त व अनुकरणीय आहेत. शिक्षण दिना निमित्ताने त्यांचे विचार आपण समजून घेऊया आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्यास आपले मोलाचे योगदान देऊया.


-लेख संकलन आणि संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख