🎓 प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांची जयंती वैचारिक उपक्रमाने साजरी..!
“ विचारांची ज्योत तेव्हाच प्रज्वलित राहते, जेव्हा ज्ञानाला प्रश्नांची आणि प्रश्नांना विवेकाची साथ मिळते.”
आज 17 सप्टेंबर 2026 रोजी परभणी येथील डॉ. कलाम विद्यार्थी फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेत प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने एका अर्थपूर्ण आणि वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास मानव मुक्ती मिशन परिवाराचे माननीय नितीन सावंत आणि रामप्रसाद अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून रामप्रसाद अंभोरे यांनी तत्त्वज्ञान, चिकित्सक विचार आणि संशोधन यांचा परस्परसंबंध उलगडून सांगितला. विचार केवळ स्वीकारायचे नसतात, तर त्यांची चिकित्सा करायची असते, प्रश्न केवळ विचारायचे नसतात, तर त्यामागील सत्याचा शोध घ्यायचा असतो, हा विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला..तसेच, महापुरुष आजच्या पिढीसाठी का आवश्यक आहेत? याचे विवेचन करताना त्यांनी महापुरुषांचे स्मरण हे केवळ जयंती-पुण्यतिथीपुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांमधून विवेक, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादित केले.
यानंतर मा. नितीन सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनातून आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत कॉ. शरद पाटील यांच्या विचार-कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर अधोरेखित केले. इतिहास, समाजव्यवस्था आणि मानवी मुक्ती यांचा चिकित्सक पद्धतीने विचार करण्याची दृष्टी विद्यार्थ्यांनी विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कॉ. शरद पाटील यांचे विचार म्हणजे केवळ भूतकाळाचा अभ्यास नव्हे, तर वर्तमान समजून घेऊन अधिक समताधिष्ठित आणि विवेकनिष्ठ भविष्याचा शोध घेण्याची बौद्धिक वाटचाल आहे, हा विचार या कार्यक्रमातून प्रकर्षाने पुढे आला.
कार्यक्रमास उपस्थित दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वैचारिक उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू चेहऱ्यांवरून आणि प्रश्नांमधून ज्ञानाची नवी क्षितिजे शोधण्याची उमेद स्पष्टपणे जाणवत होती.
आजच्या माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता विचारार्थी, प्रश्नार्थी आणि विवेकशील नागरिक बनवणे ही शिक्षणाची खरी जबाबदारी आहे.
कारण “शिक्षण माणसाला केवळ नोकरीसाठी तयार करत नाही,ते त्याला प्रश्न विचारण्याची, सत्य शोधण्याची आणि समाज अधिक मानवी करण्याची ताकद देते.”
याच व्यापक शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक भूमिकेतून डॉ. कलाम विद्यार्थी फाउंडेशनतर्फे या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन करण्यात आले.
🙏 कॉ. शरद पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!
✊ विचार जिवंत ठेवा… प्रश्न जिवंत ठेवा… विवेक जिवंत ठेवा…!
— डॉ. कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
0 Comments