परीक्षा म्हणजे केवळ प्रश्नपत्रिकेवर उमटणाऱ्या उत्तरांची कसोटी नाही; परीक्षा म्हणजे विद्यार्थ्याच्या धैर्याची, सातत्याची, आत्मविश्वासाची आणि शिस्तीची खरी ओळख असते. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर माणसाला कसोटीला सामोरं जावंच लागतं. त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा.
आज जशी परीक्षा जवळ येते, तशी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या मनातही अस्वस्थता वाढताना दिसते. ही अस्वस्थता स्वाभाविक असली तरी, ती जर भीतीत रूपांतरित झाली, तर तिचा थेट परिणाम मुलांच्या अभ्यासावर आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो. म्हणूनच या निर्णायक काळात पालकांनी घाबरून न जाता, समजून घेत, संवाद साधत आपल्या पाल्याच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे.
📌 परीक्षा म्हणजे भय नव्हे, तर संधी आहे, मित्रांनो..
स्वतःला ओळखण्याची, स्वतःवर विश्वास वाढवण्याची आणि आपल्या क्षमतांना दिशा देण्याची ही सुवर्णसंधी आहे. या प्रवासात पालकांचा आधार, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत ही त्रिसूत्री एकत्र आली, तर कुठलीही परीक्षा अवघड राहत नाही.
🔰 पालक मित्रांनो...
पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यास वेळापत्रकाकडे केवळ नियंत्रण म्हणून नव्हे, तर त्यांच्या भविष्यासाठी आखलेला मार्ग म्हणून पाहायला हवं. घरात सकारात्मक आणि शांत शैक्षणिक वातावरण निर्माण झालं, तर मुलांच्या मनात आपोआपच “मी करू शकतो.” हा आत्मविश्वास रुजतो.
प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. कुणी पटकन समजून घेतं, तर कुणाला वेळ लागतो. या फरकाला दोष न मानता, त्यामागची कारणं समजून घेत मार्गदर्शन करणं म्हणजेच मुलांमधील सुप्त शक्तीला जागं करणं होय. बाहेरील मित्रसंगत, मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियावर योग्य मर्यादा ठेवल्या, तर मुलांचं लक्ष विचलित होणार नाही.
शिक्षकांशी सकारात्मक संवाद ठेवा, कारण शिक्षक हे केवळ अभ्यास शिकवणारे नसून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे शिल्पकार असतात. आहार, झोप आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष करू नका; कारण निरोगी शरीरातच तेजस्वी विचार जन्म घेतात. लहानशा यशाचंही कौतुक करा, कारण तीच कौतुकाची थाप मोठ्या स्वप्नांना बळ देते.
चुका झाल्या तरी राग न करता त्यातून शिकण्याची संधी द्या. स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी आहे, हे वारंवार पटवून द्या. शिस्त, वेळेचं नियोजन, सकारात्मक विचार, ध्यान-प्रार्थना आणि कृतज्ञतेची भावना या मूल्यांची बीजं घरातूनच पेरली गेली, तर यश आपोआप मार्ग शोधत येतं.
येणारी बोर्ड परीक्षा ही केवळ गुणपत्रिकेपुरती मर्यादित नसून, ती उद्याच्या आयुष्याची तयारी करून देणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत विद्यार्थी फक्त अभ्यास करत नाही, तर तो संयम शिकतो, अपयश पचवायला शिकतो आणि पुन्हा उभं राहण्याचं बळ कमावतो. म्हणूनच परीक्षेत मिळालेल्या गुणांइतकंच महत्त्व या काळात घडलेल्या व्यक्तिमत्त्वालाही आहे. यशस्वी होणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच प्रयत्नशील आणि प्रामाणिक राहणंही आवश्यक आहे.
पालक आणि शिक्षकांनीही हे लक्षात ठेवायला हवं की, प्रत्येक मूल डॉक्टर, इंजिनिअर किंवा टॉपर होण्यासाठी जन्माला येत नाही; पण प्रत्येक मूल एक चांगला, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनू शकतं. परीक्षेच्या काळात मुलांच्या मनावर अनावश्यक अपेक्षांचं ओझं न टाकता, त्यांच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणं हीच खरी पालकत्वाची भूमिका आहे. गुणांपेक्षा मुलांचं मानसिक स्वास्थ्य आणि आत्मसन्मान अधिक मौल्यवान आहेत, हे आपण विसरता कामा नये.
शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की, परीक्षा येतात आणि जातात, पण या काळात मिळालेलं धैर्य, शिस्त आणि आत्मविश्वास आयुष्यभर साथ देतो. म्हणूनच, परीक्षा ही संकट न मानता एक संस्कार समजा. हीच संस्कारांची शिदोरी उद्याच्या आयुष्यात तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला, कठीण प्रसंगांना सामोरं जायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल. अशाच सकारात्मक विचारांसह, विश्वासाने आणि शांत मनाने परीक्षेला सामोरं जा… यश नक्कीच तुमचं स्वागत करायला उभं आहे.
🎓विद्यार्थी मित्रांनो…
लक्षात ठेवा, परीक्षा हा शेवटचा थांबा नाही; ती पुढील प्रवासाची सुरुवात आहे. आज केलेली मेहनत, आज दिलेला वेळ आणि आज पाळलेली शिस्तच उद्या तुमच्या यशाची पायाभरणी करणार आहे. भीतीने नव्हे, तर आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जा. कारण परीक्षा ही तुमच्या स्वप्नांचं दार उघडणारी किल्ली आहे.
लक्षात ठेवा, गुण म्हणजे आयुष्याचं अंतिम मोजमाप नाही. काही वेळा अपेक्षेप्रमाणे निकाल लागत नाही, पण त्यामुळे तुमची क्षमता कमी ठरत नाही. अपयश हे थांबवण्यासाठी नसून शिकवण्यासाठी येतं. जे अपयशातून शिकतात, तेच उद्या अधिक भक्कमपणे उभे राहतात. म्हणून निकाल काहीही असो, स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका.
या परीक्षेच्या काळात मन शांत ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं अभ्यास करणं. घाई, तुलना आणि दबाव यांना दूर ठेवा. तुमचा वेग वेगळा आहे, तुमचा मार्ग वेगळा आहे. इतरांशी नाही, तर कालच्या स्वतःशी स्पर्धा करा. आज तुम्ही कालपेक्षा थोडे जरी पुढे गेलात, तरी तोही विजयच आहे.
आजची परीक्षा उद्याच्या आयुष्याची दिशा ठरवते, पण आयुष्याची किंमत ठरवत नाही. म्हणूनच अभ्यासाबरोबर माणूसपण जपा, आत्मसन्मान जपा आणि आशा जिवंत ठेवा. कारण जे विद्यार्थी परिस्थितीपुढे न झुकता, सकारात्मकतेने पुढे जातात, तेच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतात. आत्मविश्वास, मेहनत आणि संयम या तिन्हींच्या बळावर तुम्ही नक्कीच उज्वल भविष्य घडवाल.
पालकांचा आधार, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या, तर परीक्षा ओझं न राहता विजयाची पहिली पायरी ठरते.
म्हणूनच, चला…
परीक्षेला घाबरू नका.
तिला सामोरे जा धैर्याने, विश्वासाने आणि साधनेने.
आम्ही सदैव आपल्या सोबत आहोतच.
मोफत मार्गदर्शनासाठी मित्रांनो संपर्क करा..
धन्यवाद 🙏
आपलाच स्नेही मार्गदर्शक,
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी
0 Comments