गेल्या काही दशकात महाराष्ट्रात मेडिकल कॉलेजचं झपाट्यानं वाढणं हे शिक्षणाचं यश नाही.. तर ही संस्कृतीगत फसवणुकीची पराकाष्ठा आहे..!
ज्यांनी शिक्षणाचं मंदिर उभारायला हवं होतं, त्यांनी ते व्यापारी मॉल बनवलंय...ज्ञानाचं दान करणारे आज “सवलतीत सीट विकणारे व्यापारी” झालेत.
“ज्ञानदान” ही पवित्र संकल्पना आता कर्जफेड आणि कमिशनच्या हिशोबात हरवली आहे.
ज्यांच्या हाती शिक्षणाचं दिव्य असावं, त्यांनीच ते नफ्याच्या पेटीत बंद केलं आहे...
ट्रस्ट,शिक्षण -संस्था, नेते आणि उद्योगपती यांच्या संगनमताने मेडिकल शिक्षणाचं रूपांतर ‘इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट’ मध्ये झालंय जिथं विद्यार्थ्यांचं स्वप्न विकलं जातं आणि पालकांच्या त्यागाची बोली लावली जाते..
पण अधिक भयानक म्हणजे.. समाजाने या उघड लुटीला ‘गौरवाचं प्रतीक’ आणि ‘प्रतिष्ठेची ओळख’ मानून अभिमानाने मान झुकवली आहे...
आपण शिक्षण नव्हे, तर भविष्य विकत घेतोय आणि या अंध स्पर्धेत स्वतःच्या मुलांनाच बळी देतोय.
ही शिक्षणव्यवस्थेची नव्हे.. तर ही आपल्या सामूहिक विवेकाची लाचारी आहे..!
जोपर्यंत पालक आणि विद्यार्थी वेळेच्या आत जागे होत नाहीत,..तोपर्यंत येणारा काळ डॉक्टरकी नव्हे, तर डॉक्टरांच्या बेरोजगारीचा काळ ठरेल…!
शिक्षणाचा बाजार, आरोग्याचं व्यापार..
आजचं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नाही, तर सोन्याचा बाजार झालंय.. जिथं ज्ञानाच्या नावाखाली सौदे होतात, आणि मानवतेला कॅश काउंटरवर तोललं जातं..
फॉर्म फी, डोनेशन, केपिटेशन.. सगळं अधिकृत भ्रष्टाचाराच्या छत्राखाली सुरू आहे...या व्यवस्थेचं नाव “शिक्षण” नाही,तर हा केवळ लायसन्सधारी लुटारूपणा आहे..!
आज पालक घर विकतात, जमीन तारण ठेवतात… आणि शेवटी मुलगा ‘डॉक्टर’ नव्हे, तर या लुटारू व्यवस्थेचा भाग बनतो..!
विचार करा..आपण शिक्षण विकत घेतोय की आपलं भविष्य विकतोय?
पण प्रश्न असा आहे..?
“ ही डॉक्टरकी प्रतिष्ठेची आहे का, की पैशांच्या कबरीवर उभारलेला भ्रमाचा महाल..? ”
पाच वर्षांनी हा “टायटल” म्हणजे नोकरीचं तिकीट नाही, तर बेकारीचं सर्टिफिकेट ठरणार आहे.
इंजिनिअरिंग कॉलेजांचा जो अंत झाला,तोच शेवट आता मेडिकल कॉलेजांच्याही दारात उभा आहे...
फरक इतकाच..तिकडे बेरोजगार इंजिनिअर होते आणि इथे बेरोजगार डॉक्टरांचा पूर येत्या काळात उसळणार आहे..!
हा केवळ शिक्षणाचा ऱ्हास नाही.. तर ही समाजाच्या बुद्धीची, मूल्यांची आणि विवेकाची कबर आहे!
उद्याचं दृश्य स्पष्ट दिसतंय...पण कोणी पाहत नाही...
🎓 डॉक्टर वाढले… पण पेशंट कमी..!
आज वैद्यकशास्त्राचं झाड झपाट्यानं वाढतंय,.पण त्याला फळं नाहीत, फक्त सुकलेली पानं आणि सडलेला पाया आहे..
डॉक्टरांच्या गर्दीत खरे “वैद्य” हरवलेत...डिग्री मिळतेय, पण दिशा हरवलीये..!
शिक्षणाचं झाड आता ज्ञानाच्या सावलीसाठी नाही...तर प्रतिष्ठेच्या सावलीखाली व्यवसाय वाढवण्यासाठी लावलं जातंय.
🎓आज हॉस्पिटल्स आरोग्याचं मंदिर नाहीत, तर नफ्याच्या यंत्रणेत बदललेली कारखान्यांची लाइन आहेत...
जिथं पेशंट म्हणजे “ग्राहक”, आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे कॅश काउंटर..!
उपचार नव्हे, पॅकेजेस विकले जातात;.सेवा नव्हे, सवलती दाखवल्या जातात...
आरोग्याचं रक्षण करायचं ध्येय आज मार्केटिंगच्या पोस्टरमध्ये हरवलंय..
🎓फार्मा कंपन्यांनी डॉक्टरांना “सेल्समॅन” बनवलंय..औषधांपेक्षा टार्गेट मोठं झालं,..सेवावृत्तीपेक्षा कमिशनचं टक्केवारी पत्रक अधिक पवित्र मानलं जातं..
आज डॉक्टर हातात स्टेथोस्कोपपेक्षा ब्रँडेड पेन जास्त घट्ट धरतात...रुग्णांशी संवाद नाही,औषध कंपन्यांच्या मार्केटिंग मीटिंग्स होतात..! ही स्थिती डॉक्टरकीची नाही तर वैद्यकशास्त्राच्या आत्म्याची विक्री आहे..
🎓एमबीबीएस पूर्ण केल्यानंतरही लाखो रुपयांचा सौदा....एमडीसाठी, सीटसाठी, पोस्टसाठी…
ज्ञानाचं मोजमाप आज रुपयांच्या काट्याने केलं जातं. जो पैसा देऊ शकतो, तो पुढे जातो; जो प्रामाणिक असतो, तो सिस्टीममध्ये हरवतो. ही शिक्षणव्यवस्था नाही, तर ही भ्रष्टाचाराच्या अधिकृत मंडईचं आरक्षण केंद्र आहे..!
🎓 गावोगावी क्लिनिक उघडली तरी, रुग्णांपेक्षा डॉक्टर जास्त.!
रोगापेक्षा डॉक्टरकीची स्पर्धा तीव्र झालीये..जिथं लोकांमध्ये आजारीपणा कमी, पण डॉक्टरांची हताशा जास्त दिसतेय..!
सेवेची जागा घेतलीय सेल्फी संस्कृतीने,.क्लिनिकपेक्षा सोशल मीडिया प्रोफाइल चमकतात..
परिणामत:कौशल्य असलेले डॉक्टर जगतात संघर्षात (अपवाद ) आणि प्रमोशन करणारे डॉक्टर जगतात प्रसिद्धीत..!
आजचं डॉक्टरकीचं शिक्षण “स्किल-बेस्ड” नाही, तर “सर्टिफिकेट-बेस्ड” झालंय...
डिग्री आहे, पण हातात कौशल्य नाही; माथ्यावर टायटल आहे, पण मनात सेवा नाही; आणि सिस्टीममध्ये संधी नाही..
हे डॉक्टरकीचं नाही, मूल्यांची मृत्युपत्रिका आहे... ज्यांचं ध्येय “सेवा” असायला हवं होतं, त्यांचं ध्येय आज “सेल” आणि “सेल्फी” बनलंय..!
ही स्थिती थांबवली नाही, तर उद्या रुग्णालयं राहतील..पण “सेवा” नाही...डॉक्टर राहतील.. पण “विश्वास” नाही..
समाज राहील... पण “संवेदनशीलता” नाही..!
जर डॉक्टरांची फौज अशीच तयार होत राहिली, तर भविष्यात रुग्णालयं असतील.. पण विश्वास उरणार नाही..!
सेवक असतील.. पण सेवा हरवलेली असेल..!
भविष्यातली भीषण वास्तविकता..
‘हर घर डॉक्टर’...पण लवकरच ‘हर घर बेरोजगार डॉक्टर’ ही नवी ओळख ठरेल..!
आज डॉक्टरांची संख्या अभिमानाचा विषय वाटते, पण उद्या ती बेकारीचा आकडा बनेल..ज्यांच्या हातात स्टेथोस्कोप असायला हवा होता,त्यांच्या हातात रेझ्युमे आणि रिक्वेस्ट लेटर दिसतील..
ही समाजाच्या गौरवाची नाही तर ही भविष्याची शोकांतिका आहे..!
सामाजिक दर्जा राहील, पण आर्थिक स्थैर्य संपेल. लोक अजूनही “डॉक्टर साहेब” म्हणून आदर देतील, पण बँक खाते मात्र रिकामं आणि तारणात असेल...प्रतिष्ठा टिकेल, पण उदरनिर्वाहासाठी झगडणं भाग पडेल...
आजचा “व्हाइट कोट” उद्या कर्जाचं आवरण बनेल..!
सेवा वृत्ती हरवेल, मार्केटिंग वृत्ती रुजेल...
“सेवा हीच साधना” हे वाक्य आता फ्लेक्सवरच शोभेल..खऱ्या आयुष्यात डॉक्टरकडून “डिस्काउंट” विचारला जाईल. रुग्णाचा आजार नाही, त्याचा बँक बॅलन्स तपासला जाईल...औषधापेक्षा “ऑफर” आणि “पॅकेज” जास्त महत्त्वाचं ठरेल..
वैद्यकाचं ज्ञान “अॅडव्हर्टाइजिंग कोर्स” मध्ये रूपांतरित होतंय.!
डॉक्टर हे ‘मिशन’ नव्हे, तर ‘कमीशन’चं साधन बनतील.
ज्यांनी मानवतेचा शपथविधी घेतला,..ते आज कंपनीच्या टार्गेट शीटला उत्तर देतात!
पेशंटपेक्षा प्रॉफिट, सेवापेक्षा सेल्स..ही नवी संस्कृती रुजली आहे.
मेडिकलचा “मिशन” संपून,..मार्केटिंगचं मिशन सुरू झालंय..
“हे औषध घ्या” असं म्हणणारा डॉक्टर..आता म्हणतो..“हे ब्रँड वापरा!”
येतंय एक नवं युग... डॉक्टरांची संख्या वाढेल, पण मान कमी होईल. रुग्णालयं वाढतील, पण विश्वास घटेल. डिग्री मिळेल, पण दिशा नाही मिळणार...सेवा हरवेल, आणि समाजाचा विश्वास मोडेल.
हा फक्त डॉक्टरांचा नाही, तर समाजाच्या आत्म्याचा प्रश्न आहे!
जर शिक्षण व्यवसाय झालं,तर डॉक्टर बेरोजगार होतील आणि रुग्ण बिनविश्वासाचे गुलाम..!
“डॉक्टरकीचं भविष्य धोक्यात नाही..धोक्यात आहे मानवतेचं हृदय..!”
खरी समस्या – शिक्षण नव्हे, दृष्टीकोन..
आपल्याकडे मेडिकल शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट “सेवा” नव्हतं.. “प्रतिष्ठा” होतं...म्हणून पालक मुलांना डॉक्टर बनवतात, पण विचारत नाहीत..
“तू खरंच डॉक्टरकीसाठी जन्मलायस का, की समाजात नावासाठी?”
ही मानसिकता बदलली नाही, तर पुढचा “डॉक्टरांचा पूर”
समाजाचं भविष्य बुडवेल...
विचाराची दिशा बदला..
“डॉक्टर” बनण्याआधी “मानवसेवक” बनणं शिका, विद्यार्थी मित्रांनो..मेडिकल शिक्षणात मानवी मूल्यं, नैतिकता आणि कौशल्य जोडा...कॉलेज उघडणं थांबवा, गुणवत्तेचं मंदिर उभारणं सुरू करा.
पालकांनी मुलांना व्यवसायाच्या दृष्टीने नव्हे, आवडीच्या दृष्टीने दिशा द्यावी.
आज मेडिकल कॉलेजचा स्फोट दिसतोय, पण उद्या डॉक्टरांच्या बेरोजगारीचा महापूर येणार आहे...
शिक्षणाचं सोनं, जर लोभाने काळं केलंत..तर समाजाला इलाज नाही, फक्त इतिहास उरतो..!
आपण आज एका निर्णायक वळणावर उभे आहोत... जिथं शिक्षणाचं मंदिर बाजार झालंय, आणि सेवाभाव विक्रीत गेला आहे. पण अजून सर्व काही संपलेलं नाही. अजूनही संधी आहे.. या व्यवस्थेला दिशा देण्याची, शिक्षणाच्या पाया पुन्हा मूल्यांनी बांधण्याची. समाजाने ठरवलं, तर ही व्यापारी साखळी तुटेल, आणि “ज्ञान” पुन्हा “दान” बनेल...
मात्र त्यासाठी पालकांनी अभिमान नव्हे, विवेक निवडायला हवा; विद्यार्थ्यांनी पदवी नव्हे, सेवा-परमार्थाचा मार्ग स्वीकारायला हवा; आणि शासनाने कमाई नव्हे, गुणवत्ता मोजायला हवी.
“डॉक्टर” होणं हेच ध्येय नसावं...“वैद्य” बनणं हे ध्येय असावं..
डॉक्टर औषध देतो, पण वैद्य जीव वाचवतो; डॉक्टर शरीर पाहतो, पण वैद्य आत्मा समजतो...
म्हणूनच आजची गरज आहे “डॉक्टर नव्हे, वैद्य तयार करण्याची” ज्यांच्या हातात इंजेक्शन असेल, पण मनात करुणा असेल; ज्यांच्या डोळ्यांत नफा नसेल, तर विश्वास असेल; आणि ज्यांचं शिक्षण कमाईचं नव्हे, तर कर्तव्याचं साधन बनेल..
विचार बदला — समाज बदलेल...
मूल्यं परत आली, तर मानवता जिवंत राहील...शिक्षणाचं सोनं लोभानं काळं करू नका .. कारण उद्याचं भविष्य याच निर्णयावर उभं आहे...
आपण ठरवलं, तर “हर घर डॉक्टर” ही ओळख बदलून..
“हर घर वैद्य, हर मन मानवता” असं नवं युग जन्म घेईल.
आज विवेक जागवा... कारण... जर शिक्षण व्यवसाय बनलं, तर समाजाचा अंत होईल;पण जर शिक्षण पुन्हा संस्कार बनलं.. तर मानवतेचा नव्याने जन्म होईल..!
धन्यवाद मित्रांनो..
📢 Disclaimer..
वरील लेखातील माहिती ही विविध सामाजिक माध्यमांवरील चर्चा, पालक आणि विद्यार्थ्यांचे अनुभव, तसेच समुपदेशन व सर्वसामान्य निरीक्षणांवर आधारित आहे...
या लेखाचा उद्देश कुणावर टीका करणे नाही, तर शिक्षण क्षेत्रात आणि समाजात जागरूकता व प्रबोधन वाढवणे हाच आहे.
-माहिती संकलन आणि संपादन..
-एक शिक्षणप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
DR.KALAM GROUP OF EDUCATION AND RESEARCH FOUNDATION PARBHANI.
#हरघरडॉक्टरपणभविष्यबेरोजगार #MedicalEducationCrisis #शिक्षणाचाबाजार #मेडिकलव्यवसायकीसेवा #EducationSystem #Doctorकीकीमत #DoctorVsVaidhya #शिक्षणातलालोभ #HumanityVsMoney #MedicalMafia #FutureOfDoctors #BeAwareParents #SocialAwakening #YouthAwareness #DoctorsUnemployed #DoctorWithoutDirection #ValueBasedEducation #ServiceNotBusiness #KnowledgeNotProfit #MoralCollapse #EducationalReform #StopCommercialEducation #ThinkBeyondDegree #Doctorकीनाहीवैद्यहवा #मानवतेचंआरोग्य #AwakenConscience #SaveMedicalEthics #DoctorRealityCheck #ChangeMindset #StudentAwareness #BeTheChange #EducationWithPurpose #SocialRevolution #RealDoctorRealService #ज्ञानदाननव्हेव्यवहार #WakeUpSociety #MedicalTruth #FutureAtRisk #RafiqueShaikhWrites #DrKalamFoundation #VidyarthiMitra #शिक्षणप्रेमीचा_आवाज,#हरघरडॉक्टर_पण_भविष्य_बेरोजगार#Doctorकीनाही_वैद्यहवा, #शिक्षणाचाबाजार_की_मंदिर#EducationReform #WakeUpSociety,#ProfRafiqueShaikh #VidyarthiMitra
0 تعليقات